प्रणव मुखर्जी पुण्यातील एकाच कार्यकर्त्याला ओळखत आणि `बच्चू` म्हणून हाक मारत! - Pranab Mukherjee had developed good relationship with Vilas Ingavale | Politics Marathi News - Sarkarnama

प्रणव मुखर्जी पुण्यातील एकाच कार्यकर्त्याला ओळखत आणि `बच्चू` म्हणून हाक मारत!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आदरांजली 

पुणे : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तसे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जात. काॅंग्रेसमधील इतर लोकनेत्यांप्रमाणे कोणीही कार्यकर्ता उठला आणि त्यांना जाऊन भेटला, असे सहज शक्य नव्हते. मात्र प्रवणदांचे पुण्यातील एका कार्यकर्त्याशी कमालीचे स्नेहबंध जुळले होते. बरे हा कार्यकर्ताही साधासुधा नव्हता. सहा फूट उंचीचा, उपमहाराष्ट्र केसरी म्हणून ख्याती मिळवलेला पहिलवान होता. प्रवणदा विद्वान, अभ्यासू, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभूत्व असलेले नेते. उलट हा  पहिलवान कार्यकर्ता. तरीही प्रणवदांचे मन त्याने जिंकले होते. या कार्यकर्त्याचे नाव विलास इंगवले.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका हा कुस्तीक्षेत्राचे आगार म्हणून ओळखला जातो. इंगवले यांनाही कुस्तीचे वेड होते. त्यांनी उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारली. नंतर राजकारणात उतरून मुळशी तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांची प्रवणदांची ओळख एका चित्रपट दिग्दर्शकामुळे झाली. या चित्रपट दिग्दर्शकाने त्यांना थेट कोलकत्त्याला प्रवणदांच्या घरी नेले. इंगवलेंच्या रांगड्या व्यक्तिमत्वावर प्रवणदा पण खूष झाले. या ओळखीचे रुपांतर स्नेहात झाले. इतके की प्रवणदा त्यांना `बच्चू` म्हणून हाक मारत. इंगवले हे सध्या मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेथे त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी प्रवणदांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्यात 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यात युती झाली. यात मुळशी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार आधी निवडून आलेला असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याचे गृहित धरले होते. मात्र मुखर्जी यांनी हा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडावा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला. महाराष्ट्रातील इतर मतदारसंघ सोडून प्रवणदा आपल्याच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघासाठी एवढे आग्रही का, याचे आश्चर्य त्यांनाही वाटले होते. विलास इंगवले आणि प्रवण मुखर्जी यांच्यातील एवढी जवळीक पाहून पवारांनाही विशेष वाटले होते.

मुखर्जी हे इंगवले यांच्या घरीही आले होते. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी एका कार्यक्रमानिमित्त मुखर्जींना पुण्यात बोलविले होते. तेव्हा इंगवले यांनी ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून त्यांना खूष करून टाकले होते. मुखर्जी यांच्या मुलाच्या लग्नाचे खास निमंत्रण इंगवले यांना होते. मुखर्जींच्या घरी त्यांचा दोन दिवस मुक्काम होता.

इंगवले म्हणाले की त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला नेहमी त्यांच्यासोबतच टेबलावर जेवायला बसविले. लग्नाला गेल्यानंतर दोन दिवस घरी ठेवून घेतले. त्यांचा मुलगा आणि सून हे पण माझ्या घरी भेटीसाठी आले होते. दुर्धर आजारामुळे मला राजकारणातून बाहेर पडावे लागले. हालचालींवर मर्यादा आल्या. बोलणेही अवघड झाले. त्यामुळे  नंतर माझे जाणे झाले नाही. मात्र ते राष्ट्रपतीपदी असताना त्यांचा मला दोन वेळा फोन आला होता. उपचारासाठी मदतीबद्दल त्यांनी विचारले होते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेम लाभले हे माझे भाग्यच होते, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. 

यापण बातम्या वाचा

-प्रणव मुखर्जी यांचे दिल्लीत पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन ः मोदी

प्रणव मुखर्जी - विद्वान, अभ्यासू, चाणाक्ष, व्यूहनितीतज्ञ 'भारतरत्न'

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख