परिचारक गट 41 वर्षांनंतर पुन्हा तो चमत्कार घडविणार का? 

विधानसभेच्या 1980 च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांनी व त्यांच्या गटाने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणाला जन्म घातला.
Paricharak group Will the perform  in Pandharpur  the same miracle again after 41 years?
Paricharak group Will the perform in Pandharpur the same miracle again after 41 years?

सोलापूर : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पंढरपूर विधानसभा मतदारसंघ 2009 नंतर आता पुन्हा एकदा घेऊ लागला आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले परिचारक कुटुंबीय या निवडणुकीत पुन्हा एकदा निर्णायक भूमिकेत आहे. विधानसभेच्या 1980 च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांनी व त्यांच्या गटाने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणाला जन्म घातला.

परिचारक यांनी 1980 मध्ये निवडणूक न लढविता आपली ताकद इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार पांडुरंग डिंगरे यांच्या पाठीशी उभी केली आणि कॉंग्रेसचे (यू) औदुंबरअण्णा पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनंतर परिचारक गट पुन्हा एकदा त्याच भूमिकेत आहे, तो चमत्कार परिचारक गट पुन्हा घडविणार का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. 

विधानसभेच्या 1978 च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या औदुंबरअण्णा पाटील यांना 39 हजार 205 मते मिळाली होती, तर जनता पार्टीचे सुधाकरपंत परिचारक यांनी 35 हजार 543 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. पहिली निवडणूक लढविणाऱ्या परिचारक यांची आमदारकी अवघ्या 3662 मतांनी हुकली होती. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर 1980 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खऱ्या अर्थाने चमत्कार घडला. कॉंग्रेसच्या फुटीनंतर इंदिरा कॉंग्रेसची उमेदवारी पांडुरंग डिंगरे यांना मिळाली, तर कॉंग्रेसची (यू) उमेदवारी औदुंबरअणा पाटील यांना मिळाली. त्यावेळचे दिग्गज प्रस्थ औदुंबरअण्णा पाटील यांच्यासमोर पांडुरंग डिंगरे यांच्यासारखे नवे उमेदवार रिंगणात होते. 

...अन्‌ औदुंबरअण्णांचा पराभव झाला 

सुधाकरपंत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद डिंगरे यांच्या पाठीशी उभा केली होती. सुरुवातीला सोप्या वाटणाऱ्या या लढतीत औदुंबर पाटील यांचा 3199 मतांनी डिंगरे यांनी धक्कादायक पराभव केला. त्याला परिचारक गटाची ताकद कारणीभूत होती. त्यानंतर 1985 च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक कॉंग्रेसची उमेदवारी घेत आमदार झाले आणि तब्बल 2009 पर्यंत येथील आमदारकी आपल्याकडे ठेवली. 

दिग्गजांना कठीण वाटणारे मैदान भालकेंनी तीनदा मारले 

विधानसभा मतदारसंघ पुर्नरचनेत 2009 मध्ये नवीन मतदार संघ अस्तित्वात आला. विजयसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक आणि प्रशांत परिचारक अशा दिग्गज नेत्यांना कठीण वाटणारे हे मैदान आमदार भारत भालके यांनी सलग तीनवेळा जिंकून दाखविले. विधानसभेच्या 20014 व 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत समाधान आवताडे हा फॅक्‍टर निर्णायक ठरला आहे. आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांच्या गटाने भाजपच्या झेंड्याखाली संपूर्ण ताकद आवताडे यांच्या पाठीशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रशांत परिचारकांच्या नेतृत्वाची कसोटी 

सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर पहिलीच मोठी आणि महत्वाची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे त्यांचीही मोठी कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. परिचारक आणि आवताडे गटाच्या मतांची बेरीज यावर समाधान आवताडे यांच्या विजयाची गणिते मांडली जात आहेत. सहानुभूती हे एकमेव महत्वाची जमेची बाजू भगिरथ भालके यांच्यासोबत आहे. साडेतीन वर्षांच्या या आमदारकीपेक्षा 2024 च्या निवडणुकीसाठी नवीन समिकरणे या पोटनिवडणुकीतून जन्म घेणार हे मात्र निश्‍चित. 

कारखाना निवडणुकीत रोखला भालकेंचा वारू 

विधानसभेची 2009 ची निवडणूक भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात जिंकली होती. तेव्हापासून भालकेंच्या विजयाचा वारु चौफेर दौडला. विठ्ठल सहकारी, संत दामाजी व भीमा सहकारी या साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालकेंना यश मिळत गेले. भालके यांच्या समर्थकांच्या ताब्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखाना मिळविण्यात समाधान आवताडे यांना 2016 मध्ये यश मिळाले. भालकेंच्या समोर दिग्गज पराभूत होत असताना त्यांच्या विजयाचा वारू रोखण्यात समाधान आवताडे यांना यश मिळाले होते. 

राष्ट्रवादीसाठी निवडणूक आव्हानात्मकच 

राष्ट्रवादीसाठी सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात मात्र आव्हानात्मक असणार आहे. विधानसभेच्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत परिचारक-आवताडे यांचा समझोता होऊ शकला नव्हता. पोटनिवडणुकीसाठी हा समझोता झाला आहे. राजकारणात दोन गट एकत्रित आल्यास वजाबाकी होते की बेरीज? याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com