पडळकर उडाणटप्पू; धनगर आरक्षणासाठी मोदींच्या घरासमोर आंदोलन करावे  - NCP spokesperson Umesh Patil criticizes Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकर उडाणटप्पू; धनगर आरक्षणासाठी मोदींच्या घरासमोर आंदोलन करावे 

प्रमोद बोडके 
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

मागच्या पाच वर्षांत राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना धनगर समाजाला आरक्षण का दिले गेले नाही?

सोलापूर : "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पडद्यावर आमदार गोपीचंद पडळकरांची स्टंटबाजी चालू आहे. धनगर समाजाने या लोकांची चाल पुरती ओळखली आहे. धनगर समाज निर्णायक असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले. महाराष्ट्रातील सुसंस्कृत धनगर समाज पडळकरांच्या उडाणटप्पुगिरीला भूलत नाही, हे सिद्ध झाले आहे.

समाजाचे नेतृत्व करायचे असेल आणि पडळकरांना खरोखर समाजाबद्दल कळकळ असेल तर, समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करून दाखवावे. एवढी जर हिम्मत नसेल तर त्यांनी समाजाचे नाव घेऊन राजकारण करू नये,'' असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले. 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी गडावरील पुतळ्याचे अंधारात अनावरण करण्याचा प्रयत्न केला. देशाचे नेते शरद पवार यांच्याबद्दल आमदार पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. त्याचा खरपूस शब्दांत उमेश पाटील यांनी समाचार घेतला. 

ते म्हणाले, ""आमदार पडळकरांचे बोलविते धनी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरएसएसचा विखारी जातीयवादी विचार आहे.  मराठा विरूद्ध धनगर, मराठा विरूद्ध माळी, मराठा विरूद्ध वंजारी, मराठा विरूद्ध दलित असा वाद पेटवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न ते करत आहेत. बहुजन समाजाने ही बाब लक्षात घेण्याची आवश्‍यकता आहे.'' 

"पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ म्हणणारे फडणवीस, गोपीचंद पडळकरांना दिल्लीला पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन करायला का पाठवत नाहीत? मागच्या पाच वर्षांत राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना धनगर समाजाला आरक्षण का दिले गेले नाही?

धनगर आरक्षण ही बाब शंभर टक्के केंद्र सरकारच्या अधिकारातील आहे. पडळकर दिल्लीत जाऊन समाजासाठी आंदोलन का करत नाहीत? बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्या समाज बहिष्कृत पडळकरांचा अपवित्र हात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला लागणे योग्य आहे का?'' असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. 

पडळकर बिरोबांच्या शपथेला जागले नाहीत... 

गोपीचंद पडळकर हे उडाणटप्पू कार्यकर्ता आहेत. त्यांची भाषा ही महाराष्ट्रातील सामाजिक सौहादर्य बिघडवणारी आहे. या पडळकरांनी तुम्हा आम्हा सर्वांचे आराध्य कुलदैवत बिरोबाची जाहीर शपथ घेतली होती व भाजपमध्ये कधीही जाणार नाही, असेही सांगितले होते. पडळकर हे बिरोबाच्या शपथेला जागले नाहीत, त्यामुळे समाजानेच त्यांना बहिष्कृत केले आहे, असा दावाही पाटील यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख