NCP in Parbhani May face Problems due to entry of Sitaram Ghandat | Sarkarnama

घनदाटमामा राष्ट्रवादीत आले पण धनंजय मुंडेंचे मेव्हणे दूर जाणार? 

गणेश पांडे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकसभा व विधानसभा जरी आज घडीला ताब्यात नसल्या, तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्या इतकेच काय तर ग्रामपंचायती देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहेत. यावरूनच राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख झालेल्या परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तितक्याच ताकदीने आपली पाळेमुळे घट्ट करताना दिसत आहेत.

परभणी : सातत्याने अपक्ष असतांनाही सोयी नुसार सत्तेच्या पाठीशी राहणाऱ्या माजी आमदार सीताराम घनदाट (मामा) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढणार आहे. पाथरी विधानसभेत आमदार बाबाजानी दुर्राणी, जिंतूर विधानसभेमधून माजी आमदार विजय भांबळे या दोन मात्तबर नेत्यांबरोबरच आता गंगाखेड विधानसभा मतदार संघातही माजी आमदार सीताराम घनदाट यांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. परंतू, एकीकडे जिल्ह्यातील ताकद वाढणार असली तरी खुद्द गंगाखेड  तालुक्यात मात्र पक्षातील गटबाजी आगामी काळात प्रकर्षाने पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकसभा व विधानसभा जरी आज घडीला ताब्यात नसल्या, तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्या इतकेच काय तर ग्रामपंचायती देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहेत. यावरूनच राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख झालेल्या परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तितक्याच ताकदीने आपली पाळेमुळे घट्ट करताना दिसत आहेत. गंगाखेड तालुक्याचा किंवा विधानसभेचा विचार केल्यास या तालुक्यात आज पर्यंत कुणा एका पक्षाची ताकद कायम राहीलेली नाही. 

या तालुक्याचा कसलाही संबध नसतांना १९९१ साली सीताराम घनदाट यांचा गंगाखेडच्या राजकारण अपक्ष राजकारणी म्हणून उदय झाला. प्रशासनाची जवळून ओळख असणारा परंतू, तितक्याच पध्दतीने सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करणारा नेता म्हणून सीताराम घनदाट यांची ओळख झाली. घनदाट मित्र मंडळाच्या माध्यमातून विधानसभेचे स्वप्न पाहून तालुक्याच्या राजकारणा प्रवेश केलेल्या सीताराम घनदाट यांनी अल्पावधीत तालुक्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायती व चक्क जिल्हा परिषदेत सुध्दा आपले उमेदवार पोहचविले. आज घडीला गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पूर्णा व पालम तालु्क्यात त्यांचा वरचष्मा आहे. अनेक संस्था आज घडीला घनदाट मित्र मंडळाच्या ताब्यात आहेत. 

गावपातळीवर मित्र मंडळाच्या शाखाचे जाळे विणले गेले आहे. यामुळे भक्कम कार्यकर्ता वर्ग ही मामांच्या पाठीमागे कायम दिसतो. धनदाट मामा सलग २०१९ च्या लोकसभा निवडणुकीअगोदर सीताराम घनदाट यांचा शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा झडल्या होत्या. खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नातून मामांना शिवसेनेत आणले जाणार होते. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे तेव्हा मामांना शिवबंधन बांधता आले नाही. परंतु, त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले. त्यांनी पक्षाने आपल्या तिकिट दिल्यास आपण निश्चित या मतदार संघातून निवडणुक लढवू असे ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून सांगितले होते. 

परंतु, त्यावेळी मंत्री धनंजय मुंढे यांचे मेव्हणे डॉ. मधुसुदन केंद्रे यांना परत एकदा विधानसभेची संधी देण्यात आली. त्यामुळे तेव्हा सीताराम घनदाट यांनी अपक्ष निवडणुक लढविली होती. या मतदार संघात सीताराम घनदाट यांची व्होट बँक चांगली आहे. अभ्युदय बॅंकेच्या माध्यमातून या मतदार संघातील हजारो बरोजगारांना घनदाट मामांनी नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे सहाजीक तो मतदार मामांपासून कधीच दुर जात नाही. त्यामुळे अपक्ष जरी निवडणुक रिंगणात मामा उतरले तर त्यांना पडणारे मतदान हे ४० ते ४५ हजारांच्या वरच असते. यावरूनच मामांची ताकद आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात जाऊन पडली आहे. सीताराम घनदाट यांचे नातू भरत घनदाट हे पेठशिवणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आहेत. त्यांनी देखील आजोबासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकंदरच सीताराम घनदाट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले बळ मिळणार आहे हे मात्र निश्चित.

गंगाखेड तालुक्यात गटबाजीची शक्यता
एकीकडे सीताराम घनदाट यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असली तरी मात्र गंगाखेड तालुक्यात पक्षाला गटबाजीचा सामना आगामी काही दिवसात करावा लागू शकतो. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे व सीताराम घनदाट यांच्या फारसे सख्य नाही. जरी डॉ. केंद्रेची ताकद विधानसभा मतदार संघात नसली तरी आगामी काळात पक्षातील या दोन नेत्यामध्ये दुफळी दिसून येऊ शकते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख