nana patole wishes to take revenge of two insult incidents in congress | Sarkarnama

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष बनून काॅंग्रेसमधील या दोन `अपमानां`ची परतफेड करायचीय!

योगेश कुटे
शुक्रवार, 29 मे 2020

राज्याचा नेता होण्याची पटोले यांची इच्छा आहे. त्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेश नेतृत्त्व करण्याची त्यांनी इच्छा आहे. पण त्यांच्या फटकळ आणि आक्रमक स्वभावामुळे प्रस्थापित नेते त्यांच्यासाठी नकारघंटा वाजवत आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पटोले यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यास ते विरोध करण्याची शक्यता फारच कमी आहे. पण पक्षांतील इतर ज्येष्ठ नेते पटोलेंची ही इच्छा सहजासहजी पूर्ण होऊ देतील, अशी स्थिती नाही.

पुणे : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू झाली.  खुद्द नानांनी आपली ही इच्छा लपवून ठेवलेली नाही. कारण आपण संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक आणि सक्षम असूनही आपल्याला योग्य संधी मिळत नाही, अशी त्यांची खंत आहे. यापेक्षा दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना काॅंग्रेस नेत्यांनी केलेल्या अपमानांचाही बदला यानिमित्ताने घ्यायची संधी मिळणार आहे.

बंडखोर नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. 1999 पासून साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यांचा आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा 36 चा आकडा! पटोले हे सुरवातीला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळचे मानले जात होते. विलासरावांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात घेण्याचा प्रयत्न केला. पण पटोले समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांचे नाव दर वेळी `दिल्ली`तून कापले जायचे. राष्ट्रवादीत असूनही हे काम प्रफुल्ल पटेल करायचे, असा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. काॅंग्रेसने आपल्याला ओबीसी नेता किंवा शेतकऱ्यांचा नेता बनण्याची संधी द्यावी, असा प्रयत्न त्यांनी सुरवातीपासून केला. पण त्यांना ती संधी शेवटपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे पटोले यांची साकोलीचे आमदार म्हणूनच ओळख 2014 पर्यंत राहिली.

काॅंग्रेसला सोडचिठ्ठी!

त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 2008 मध्ये काॅंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामाही दिला. तत्कालीन काॅंग्रेस आघाडी सरकारने त्या वर्षी 70 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या हिताची नाही, अशी टीका करत त्यांनी काॅंग्रेसचा राजीनामा दिला. या कर्जमाफीत केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जपले आहे, असा आरोप करून त्यांनी आमदारकीचा आणि काॅंग्रेसचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढविली आणि ते परत विधानसभेत आले.

भाजप आपल्याला संधी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र तेथेही त्यांना दुय्यम स्थानावरच समाधान मानावे लागले. तेथे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे असे ओबीसी नेते असताना कुणबींचा नेता म्हणून पटोलेंना पुढे यायचे होते. पण ते साध्य झाले नाही. तरीही तेथे त्यांनी बराच काळ तग धरला. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पटेलांना पराभूत करण्याचे स्वप्न साकार झाले. त्या वेळी नितीन गडकरी यांनी त्यांना विधानसभा निवडणूकच लढविण्याचा सल्ला दिला होता. तसेच आमदार झाल्यानंतर मंत्री होण्याची संधी मिळेल, असेही सांगतिले होते.  पण पटेलांना घरी बसविण्याचे नानांच्या डोक्यात असल्याने त्यांनी लोकसभा निवडणूकच लढविली आणि 2014 च्या मोदी लाटेत पटेल यांचा भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पराभव झाला. पटोलेंचे खासदारकीचे स्वप्न साकार झाले. 

मोदींच्या पसंतीस पडलेले उत्तर

पटोले हे तसे `स्ट्रीट स्मार्ट` आहेत. कोठे काय बोलायचे याचे त्यांना पक्के भान असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या सरकारचे सुरवातीचे दिवस अतिशय कौतुकाचे होते. मोदींच्या प्रत्येक कृतीची दखल माध्यमे सकारात्मकतेने घेत होते. तर पंतप्रधान संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसद भवनातील खासदारांच्या कॅंटिनमध्ये गेेले. तेथे जाऊन ते चहा पिले. खासदारांच्या टेबलवर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. नाना पटोले जेथे बसले तेथेही पंतप्रधान गेले होते. पंतप्रधान शक्यतो कॅंटिनमध्ये येत नाहीत. त्यामुळे मोदींची ती कृती मिडियात गाजली. मोदी खासदारांशी काय बोलले, हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी तेथे उपस्थित असलेल्यांसमोर `बूम` धरले. कोणी काही सांगितले तर कोणी इतर काही. पण नानांनी एकदम भारी उत्तर दिले. `मोदींनी मला देशातील गरिबांची चिंता आहे. त्यांच्यासाठी मी काम करतो आहे. तुम्ही मला साथ द्या, असे आम्हा खासदारांशी बोलताना सांगितल्याचा `बाईट` नानांनी माध्यमांना दिला. मोदींना देशातील गरिबांची चिंता, या शीर्षकाने मग दिवसभर बातम्या चालल्या. मोदींच्या नजरेतूनही नानांचे हे उत्तर एकदम झकास ठरले. नंतर सभागृह परत भरल्यानंतर त्यांनी नानांना चिठ्ठी पाठवली व नंतर पंधरा मिनिटे भेटीसाठी बोलविले. पंतप्रधानाने अधिवेशन काळात एवढा वेळ एका खासदाराला देणे, हे तेव्हा आश्चर्य़ाचे मानले गेले. मोदींच्याही कौतुकास पात्र ठरलेले नाना मात्र लवकरच तेथे नावडते झाले.

पटोले यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची हौस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक बोलविली होती. मोदींची बैठक म्हणजे केवळ त्यांनी एकट्यानेच बोलायचे आणि इतरांनी ऐकायचे, असा सिलसिला असतो. या बैठकीत नानांनी सरकारच्या विरोधातील काही मुद्दे मांडले आणि शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. भाजपच्या दृष्टीने तो उद्धटपणा होता. मोदींनी त्यांच्या शैलीमध्ये त्या बोलण्याचा समाचार घेतला. नानांना तेथेच सिग्नल मिळाला की भाजपचे पुढचे तिकिट आपल्याला नाही.  भाजपवालेही त्यांना टाळू लागल्याने ते त्या पक्षात एकाकी पडू लागले. त्यात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचेही मधुर संबंध लक्षात आल्याने भाजपमध्ये आपली डाळ शिजणार नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनाही भाजपचा कंटाळा आला.  मोदींवर ते टीका करू लागले. भाजपमधीलच एखादा खासदार मोदींवर टीका करतोय, असे पहिलेच चित्र असल्याने त्यांनाही मग देश पातळीवर प्रसिद्धी मिळू लागली.

राहुल टिममध्ये समावेश

त्याच वेळी काॅंग्रेसमध्ये बदल होऊन राहुल गांधी हे अध्यक्ष झाले होते. मोदींच्या विरोधात बोलणारा भाजपचा खासदार म्हणून काॅंग्रेसनेही मग त्यांना जवळ केले. राहुल यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यासाठी त्यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला. काॅंग्रेसमध्ये राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले. काॅंग्रेसच्या किसान संघटनेचे किंवा विदर्भाचे नेतृत्त्व देण्याची मागणी त्यांनी गांधींकडे केली. राहुल यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मुंबईतील कार्यालयातून पाहण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्याचे प्रदेशच्या नेत्यांना सांगितले. पण प्रदेश पातळीवरील नेत्यांनी नानांना पक्षात फारसे काम राहणार नाही, याची काळजी घेतली. त्यांना अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून इतर दुय्यम नेत्यांप्रमाणे संधी दिली. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदियात लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. सुरवातीला नानांची ती निवडणूक लढविण्याची इच्छा होती.  पण त्यांना काॅंग्रेसच्या प्रभारी नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची इच्छा राहुल गांधींची असल्याचा निरोप दिला. पटोले यांनी आता थेट राहुल यांचाच निरोप असल्याचे कळल्यावर त्यास होकार दिला. ही जागा राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे लढले आणि ते खासदार झाले. नंतरच्या एका भेटीत राहुल यांनी त्यांना तुम्ही भंडारा-गोंदियाची निवडणूक लढवायला का नकार दिला, असा सवाल केला. तो ऐकून नाना उडाले आणि तुमचाच तसा निरोप असल्याचे मला सांगितल्याने मी बैठकीत काही बोललो नाही, असे उत्तर दिले. त्यावर त्रस्त झालेल्या राहुल गांधींनी मग त्या प्रभारीला घरी बसविले, असा किस्सा सांगण्यात येतो. राहुल गांधी यांनी निरोप देऊनही पटोले यांना प्रदेश उपाध्यक्ष केले गेले नाही किंवा विदर्भाचीही जबाबदारी मिळाली नाही. उलट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानांना तास-दीडतास ताटकळत ठेवूनच भेटायला वेळ देत होते, अशी उलटी परिस्थिती झाली. त्यांना नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविण्यास भाग पाडून त्यांचा `कार्यक्रम` पक्षश्रेष्ठींनी केला होता. पण राहुल यांच्याशी व्यवस्थित संबंध असल्याने त्यांनी नानांना अमेठी आणि वायनाडमध्येही प्रचार नियोजनात संधी दिली होती.  

काॅंग्रेसने केलेले दोन `अपमान!`

यावर कडी ही विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळीस झाली. काॅंग्रेसची उमेदवारी निश्चित असूनही किंवा त्यांच्या साकोली मतदारसंघात इतर कोणी इच्छुक नसूनही त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले नाही. दुसऱ्या यादीतही झाले नाही. अखेरीस त्यांचे नाव स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात आले. आपले नाव जाहीर होण्यास एवढा विलंब कसा काय, याचाही सवाल त्यांना पडला होता. ते आमदार झाले. राज्यात बऱ्याच घडामोडी होऊन महाआघाडी सरकार स्थापन झाले. आपण राज्यात अखेरीस मंत्री होणार, असे नानांना वाटू लागले. तेथेही माशी शिंकली. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. राज्याचा नेता होण्याची पटोले यांची इच्छा आहे. त्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेश नेतृत्त्व करण्याची त्यांनी इच्छा आहे. पण त्यांच्या फटकळ आणि आक्रमक स्वभावामुळे प्रस्थापित नेते त्यांच्यासाठी नकारघंटा वाजवत आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पटोले यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यास ते विरोध करण्याची शक्यता फारच कमी आहे. पण पक्षांतील इतर ज्येष्ठ नेते पटोलेंची ही इच्छा सहजासहजी पूर्ण होऊ देतील, अशी स्थिती नाही. पण तरीही प्रदेशाध्यक्षांनी ताटकळत ठेवण्याच्या आणि तिकिट उशिरा जाहीर करण्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीचे प्रयत्न ते सोडतीलच, असे नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख