पडळकरांच्या प्रश्‍नावर जानकर म्हणाले, 'पुन्हा पुन्हा तोच प्रश्‍न विचारू नका'  - Mahadev Jankar got angry at Gopichand Padalkar's question | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकरांच्या प्रश्‍नावर जानकर म्हणाले, 'पुन्हा पुन्हा तोच प्रश्‍न विचारू नका' 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

माझा फोटो लावून आमदार, नगरसेवक म्हणून काहीजण निवडून आले आहेत.

पंढरपूर : मला साईटला टाकण्यासाठी कोणाला पुढे आणले, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. कोण कोणाला साइटला करण्याचा प्रश्‍नच नाही आणि पत्रकारांनाही पुन्हा पुन्हा तोच प्रश्‍न विचारू नये, असे माझं आवाहन आहे, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला आमदार महादेव जानकर यांनी उत्तर दिले. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य महादेव जानकर हे मंगळवारी (ता. 2 फेब्रुवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी पंढरपूर येथे ते बोलत होते. 

आमदार गोपीचंद पडळकर यांना ओबीसी चेहरा म्हणून भाजप पुढे करताय, याबाबत आपलं मत काय आहे, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. जानकर म्हणाले की प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मी जेव्हा मंत्री नव्हतो, तेव्हा डॉ. विकास महात्मे यांना खासदार करण्यात आले होते. त्यावेळीही जानकर यांना दाबण्यासाठी भाजपने महात्मे यांना आणलं, अशी माध्यमातून चर्चा झाली होती. पण असं कोण कोणाला दाबत नसतं. महादेव जानकर क्रिएयटर आहे आणि तुम्ही ज्यांची नावं घेत आहेत, ते कार्यकर्ते आहेत. निर्माणकर्ता आणि निर्माण होणारा यात फरक असतो. 

"प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला पक्षाचं स्वातंत्र्य आहे ना? मी काय सर्वांचा मालक नाही. माझा पक्ष आहे आणि तुम्ही ज्यांची नावं घेता ना? ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मग कोण कोणाला साईडट्रॅक करण्याचा प्रश्‍नच नाही. ज्याची ताकद असेल तो पुढे जाईल,'' असेही त्यांनी सांगितले. 

"माझा फोटो लावून आमदार, नगरसेवक म्हणून काहीजण निवडून आले आहेत. रासप हा स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे. नेता बनविण्याची फॅक्‍टरी माझ्याकडे आहे. मला कोणाकडे तिकिट मागायला जावे लागणार नाही. रासपचं संघटन वाढवणं म्हत्वाचं आहे. त्यामुळे कोण दौरे काढत आहे, याच्याशी मला काही देणे घेणं नाहीत,'' असे पडळकर यांच्या वाढत्या दौऱ्याबाबत जानकर यांनी उत्तर दिले. 

मी भारतीय जनता पक्षाचा नाही, त्यामुळे भाजपने माझ्यावर विश्‍वास का ठेवावा. मी "एनडीए'तील एक घटकपक्ष आहे. माझे आमदार, खासदार आले तरच मला एनडीएत ठेवतील. नाहीतर काढून टाका याला असं म्हणतील. त्यामुळे कोणावर रागवण्याचे कारण नाही. विरोधी पक्षाचे सरकार आल्यावरही आम्ही काही यूपीएमध्ये गेलो नाही. आम्ही आजही एनडीएमध्येच आहोत. आमच्या पक्षाचे दोन आमदार, 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसेच गुजरातमध्ये 28 नगरसेवक आहेत. बेंगलोर, आसामध्ये आमचा पक्ष आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख