ईडी, सीबीआयला ओवेसी बंधूंची संपत्ती दिसत नाही का? - ED, CBI does not see the wealth of Owaisi brothers? : Mahboob Sheikh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

ईडी, सीबीआयला ओवेसी बंधूंची संपत्ती दिसत नाही का?

प्रमोद बोडके
शनिवार, 17 जुलै 2021

भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आणि एमआयएमचा विस्तार देशभर होऊ लागला.

सोलापूर : भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम हे दोघे एकच आहेत. केंद्र सरकार ईडी व सीबीआयचा उपयोग भाजप विरोधी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी करत आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दिन ओवेसी आणि त्यांचे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या संपत्तीची वारंवार चर्चा होते. त्यांची ही संपत्ती ईडी आणि सीबीआयला का दिसत नाही? असा सवाल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आज (ता. १७ जुलै) सोलापुरात उपस्थित केला आहे. (ED, CBI does not see the wealth of Owaisi brothers?: Mahboob Sheikh)

सोलापुरातील एमआयएम नगरसेवकांच्या नातेवाईकांनी आणि कार्यकर्त्यांनी आज एमआयएममधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

हेही वाचा : पवार-शिंदे यांच्यात कोणता करार झाला होता, हे मला माहीत नाही

युवक प्रदेशाध्यक्ष शेख म्हणाले, एमआयएम म्हणजे मोदी इनक्‍लूड मेंबर असा त्याचा अर्थ आहे. गेल्या 70 वर्षांपासून हैदराबादपुरताच मर्यादित असलेला हा पक्ष 2012 मध्ये अचानक पुढे कसा आला? भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आणि एमआयएमचा विस्तार देशभर होऊ लागला. देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आपले उमेदवार उभे करून भाजपला मदतच केली आहे.

हैदराबाद महापालिकेच्या सर्व जागा आजही एमआयएम लढवू शकत नाही. देशात मात्र विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करत आहे. भाजप आणि एमआयएम हे दोघे एकच आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष शेख यांनी केला. आमच्यासाठी भाजप जशी जातीयवादी आहे, तशीच एमआयएम देखील जातीयवादीच आहे. एका जातीच्या किंवा एका धर्माच्या नावावर सत्ता येऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असायला हवी, ही भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस निभावत आहे.

ओवेसी बंधू यांच्यात एवढीच ताकद आहे, तर त्यांनी तेलंगणामध्ये एमआयएमची सत्ता आणून दाखवावी, असे आव्हानही प्रदेशाध्यक्ष शेख यांनी दिले. एमआयएम हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेला भेदण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्‍य विभागल्यास माणुसकी धोक्‍यात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख