शरद पवारांनी भरवली सुशीलकुमार शिंदेंना द्राक्ष  - Dedication of Kingberry variety of grapes by Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी भरवली सुशीलकुमार शिंदेंना द्राक्ष 

संतोष सिरसट 
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

शरद पवारांनी मला शेतीचे वेड लावले आहे.

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज येथील कृषिभूषण दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या द्राक्षाच्या किंगबेरी या नव्या वाणाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आपल्या हातातील द्राक्षाच्या घडातील एक मणी तोडून तो मणी पवार यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भरवला. त्याचवेळी शिंदे यांनीही पवारांना द्राक्षाचा मणी भरवला. त्यामुळे उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. 

दिल्लीच्या सीमेवर मागील अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे कानावर येत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. या शेतकरी आंदोलनातून केंद्र सरकार धडा घेईल, असे मत पवार यांनी या वेळी व्यक्त केले. 

या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनराव शिंदे, यशवंत माने, सुभाष देशमुख, रवींद्र बाबर, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, प्रदीप गारटकर, उमेश परिचारक, कृषीभूषण दत्तात्रेय काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद उपस्थित होते. 

पवार म्हणाले की, नान्नजमध्ये आल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नान्नजकरांनी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत. कमी पाण्याची पिके घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भविष्यात शेतकऱ्यांनी शेतीत नवे विज्ञान, तंत्रज्ञान आणणे आवश्‍यक आहे. शेती सुधारण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. शेतकऱ्यांच्या प्रयोगातूनच नवनवीन वाणांचा जन्म झाला आहे. (कै.) नानासाहेब काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र दत्तात्रेय काळे यांनी शेतीत आधुनिकता आणली आहे. शेतीत बदल, नावीन्य, दर्जा, जमिनीचा पोत सुधारणे, कमी पाण्यात शेती करणे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे आणि नान्नज हे त्याचे केंद्र झाले आहे. नव्या पिढीच्या शेतकऱ्यांनी यातून शिकण्याचे आवाहनही पवार यांनी केले. 

द्राक्ष उत्पादने निर्यात करणाऱ्या जवळपास 80 कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. त्या कंपन्यांची यादी माझ्याकडे आली आहे. याबाबत 1-2 दिवसांत दिल्लीमध्ये जाऊन संबंधित कंपन्यांना धडा शिकवणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

या वेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवारांनी मला शेतीचे वेड लावले आहे. आज माझ्याकडेही द्राक्षाची बाग आहे. पण, सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. 

कृषिभूषण दत्तात्रेय काळे यांनी एकूणच वाटचालबद्दल प्रास्ताविकात माहिती दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख