राजू शेट्टींची सध्याची राजकीय भूमिका डब्बल ढोलकीसारखी  ः नाना पटोलेंची खरमरीत टीका - Congress state president Nana Patole criticizes former MP Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टींची सध्याची राजकीय भूमिका डब्बल ढोलकीसारखी  ः नाना पटोलेंची खरमरीत टीका

भारत नागणे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

राज्यातील सरकार पाच वर्षे सत्तेवर राहील. कोणीही पाडू शकत नाही.

पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये घटकपक्ष आहे. तरीही त्यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांची सध्याची राजकीय भूमिका ही डब्बल ढोलकीसारखी आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पटोले गुरुवारी (ता. १५ एप्रिल) पंढरपुरात आले होते. त्यांची संत तनपुरे महाराज मठात सभा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भारतात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. तर, दुसरीकडे देशात लसीकरण कमी झाल्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे, असा आरोपही पटोले यांनी मोदी सरकारवर केला.

पटोले म्हणाले की, देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात होत असल्या तरी रुग्णांना बेड आणि औषध पुरवठा अपुरा पडत आहे. सहा महिन्यांपूर्वीच राज्यात आणि देशात लसीकरण सुरु केले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशात रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. देशाच्या सीमा 2019 मध्ये सील केल्या असत्या, तर आज देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसला असता. राज्यातील सरकार पाडणं हा त्यांचा उद्देश आहे. भाजप हा सत्ताजीवी झाल्याचा आरोप करत राज्यातील सरकार पाच वर्षे सत्तेवर राहील. कोणीही पाडू शकत नाही, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. प्रतीलिटर पेट्रोलवर 22 रुपयांचा अधिकचा कर जनतेच्या खिशातून काढून घेतला जात आहे. रस्त्याच्या आणि शेतकऱ्यांच्या नावाने हे सरकार पैसे गोळा करुन लूट करत आहे. त्यामुळे देशातील जनता आणखी गरीब होत आहे. भाजपने ठरवून केलेलं हे पाप आहे. लोकसभेत जातीनिहाय जनगणना करणार नाही, असं मोदी सरकारने सांगितले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नेहमी खोटं बलून ओबीसीची फसवणून करतात. या निमित्ताने  त्यांचा ओबीसी विरोधी चेहरा आता समोर आला आहे. न्हावी, शेतकरी, फुलवाले, कामगार, डबेवाले या लोकांनाही राज्य सरकारने कोरोनाकाळात आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही या वेळी पटोले यांनी सांगितले.

या वेळी काँग्रेसचे  सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार प्रणिती शिंदे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्ह युवक  काँग्रेसचे अध्यक्ष नितीन
नागणे, उमेदवार भगिरथ भालके, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख