दानवेजी, भाडोत्री बाप तुमचा तुम्हाला लखलाभ होवो : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल  - Chief Minister Uddhav Thackeray criticizes Union Minister Raosaheb Danve | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेजी, भाडोत्री बाप तुमचा तुम्हाला लखलाभ होवो : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आहेराची पाकिटे पळविणारे तुमचे बाप असतील, तर ते तुम्हालाच लखलाभ होवो.

मुंबई : रावसाहेब दानवे म्हणाले की, लग्न तुम्ही केले आणि पैसे बापाकडे मागता. पण, दानवेजी बाप तुमचा असेल. माझ्या बाप इकडे महाराष्ट्रात आहे. तो कायम माझ्यासोबत असतो. कधी कधी तो माझ्या शरीरात असेल, विचारात असेल. भाडोत्री बाप स्वीकारायची माझी तयारी नाही. तो भाडोत्री बाप तुमचा तुम्हाला लखलाभ होवो. माझे आई-बाप या मातीत आहेत, आमच्यासोबत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रावासाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. 

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रविवारी (ता. 25 ऑक्‍टोबर) आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांनी विविध मुद्यांची मांडणी करत भाजपवर हल्लाबोल केला. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे जीएसटीच्या थकबाकीची मागणी केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये बोलताना केंद्राकडील थकबाकीचा उल्लेख केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असतानाही त्याचा पुनरुच्चार केला होता. त्यावर राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्राकडे राज्याची कोणतीही थकबाकी नसल्याचे सांगत आहेत. विशेषतः देवेंद्र फडणवीस आकडेवारीनिशी माहिती देत आहेत. 

त्या संदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, जीएसटीचा निधी मिळत नाही. इतर हक्काचे पैसे केंद्राकडे आम्ही मागायचे नाहीत का? राज्यात जूनपासून आलेल्या आपत्तीमधील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही केंद्र सरकारकडे निधीची मागणी करतोय. पण त्यांच्याकडून एक नया पैसा, एक छदामही मिळालेला नाही. आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागायाचे नाहीत का? 

"त्यावर रावसाहेब दानवे कुठेतरी म्हणाले की, लग्न तुम्ही केले आणि पैसे बापाकडे मागता. पण, दानवेजी बाप तुमचा असेल. माझा बाप इकडे आहे. तो कायम माझ्यासोबत असतो. कधी कधी तो माझ्या शरीरात असेल, विचारात असेल. भाडोत्री बाप स्वीकारायची माझी तयारी नाही. तो भाडोत्री बाप तुमचा तुम्हाला लखलाभ होवो. माझे आईबाप या मातीत आहेत, आमच्यासोबत आहेत,' अशी कठोर टिका ठाकरे यांनी दानवे यांच्यावर केली. 

होय, आम्ही लग्न जरूर केले आहे. लग्न करताना बाप तर सोडा हो, आहेरीची पाकिटे ज्यांना देत होतो ना? तो आहेर घेऊन पळालेला आहे. मोजता म्हणाला, मोजतो आणि आणून देतो, असेही म्हणाला. पण, अजून मोजत बसला आहे. खाल्ले की काय देव जाणो? आहेराची पाकिटे पळविणारे तुमचे बाप असतील, तर ते तुम्हालाच लखलाभ होवो. आमचे आईबाप इकडेच आहेत, असा टोला त्यांनी दानवेंना लगावला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख