जयंत पाटील अनावधानाने राजकारणात आलेली व्यक्ती : गोपीचंद पडळकर  - BJP MLA Gopichand Padalkar criticizes Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

जयंत पाटील अनावधानाने राजकारणात आलेली व्यक्ती : गोपीचंद पडळकर 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

पण, त्यांनी स्वप्न पहायला हरकत नाही.

पुणे : "राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनवाधानाने राजकारणात आलेले आहेत. अनुकंपाच्या नोकरीत ज्याप्रमाणे पात्रता लागते आणि गुणवत्ता लागत नाही. त्याच पद्धतीने जयंत पाटील हे मुळातच राजारामबापूंच्या अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत. राज्यात राष्ट्रवादीत तशी परिस्थिती निर्माण होईल, असे मला वाटत नाही. पण, स्वप्न पहायला हरकत नाही,'' अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबतच्या विधानाची खिल्ली उडवली. 

काही दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हायला आपल्याला आवडेल, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर पडळकर यांनी वरील मत व्यक्त केले. 

आमदार पडळकर म्हणाले, "जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली ही बाब ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीरपणे घ्यावी आणि त्यांना "यूनो'मध्ये वगैरे पाठवता येत का? वरच्या लेवलला, हे पहावे. कारण ते फार बुद्धिवान आहेत, अशी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांना वरच्या लेवलला पाठवलं तर काहीतरी होईल.'' 

"महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असं काही मला वाटत नाही. स्वप्न बघायला हरकत नाही. पण, तुम्ही ज्या पदावर 1990 पासून काम करत आहात. सांगली जिल्ह्यामध्ये केलेले एक काम तुम्ही सांगू शकत नाही. इतक्‍या वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मी एवढं मोठं काम केले आहे, एक प्रोजेक्‍ट केलेला आहे, हे तुम्ही सांगू शकत नाही. सांगली जिल्ह्यात जे येईल, ते आपल्याच (इस्लामपूर) मतदारसंघात न्यायचे,'' असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख