वडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच्या ऑक्‍सिजनसाठी - Bihar driver drove a tanker for 11 hours to deliver oxygen to Solapur | Politics Marathi News - Sarkarnama

वडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच्या ऑक्‍सिजनसाठी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

त्याने तब्बल अकरा तास सलगपणे टॅंकर चालविला.

सोलापूर : सोलापूर ते बेल्लारी (कर्नाटक) हे अंतर सुमारे 380 किलोमीटर असून ऑक्‍सिजनचा टॅंकर मंगळवारी रात्री साडेसात वाजता निघाला आणि आज (बुधवारी, ता. २८ एप्रिल) सकाळी सहा वाजता सोलापुरात पोचला. या टॅंकरचा चालक विजय यादव हा बिहारचा असून त्याच्या वडिलांना कोरोना झाला आहे. त्याला ऑक्‍सिजन उतरविण्याची संपूर्ण माहिती असल्याने त्याची गरज होती. त्याच्या मनात कुटुंबाची चिंता असतानाही त्याने सोलापुरातील रूग्णांसाठी ऑक्‍सिजनचा टॅंकर तब्बल अकरा तास सलगपणे चालविला.

सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची गरज वाढली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नियोजनानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे हे दहा दिवसांपासून विनाविलंब आणि अतिजलद वाहतुकीसाठी परिश्रम घेत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणे परिसरातील औद्योगिक वसाहतीतून सोलापूरसाठी ऑक्‍सीजन देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यासाठी टॅंकरचे अधिग्रहण होणे गरजेचे होते. मोटार वाहन निरीक्षक किरण गोंधळे यांनी पुण्यातून खासगी ट्रान्सपोर्टचे टॅंकरचे अधिग्रहण करून प्रशिक्षित चालकदेखील उपलब्ध केले. 

पुण्यातून होणारा ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने बेल्लारीतून ऑक्‍सिजन आणला जात आहे. मंगळवारी (ता. 27 एप्रिल) मोटार वाहन निरीक्षक आशिष पाराशर, महेश रायभान, चालक अंबादास मंटूरकर यांनी टॅंकर चालक विजय यादव (बिहार) याला घेऊन बेल्लारीतील जिंदाल उद्योग समूहाच्या जेएसडब्ल्यू इंडस्ट्रियल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेडमधून ऑक्‍सिजनचा टॅंकर सोलापुरसाठी मिळविला. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्याबरोबरच टॅंकरचालक विजय यादव यांचेही कौतुक केले.
 
सिव्हिल हॉस्पिटलसाठी दोन टन ऑक्‍सिजन 

कर्नाटकातून ऑक्‍सिजनची वाहतूक करण्यासाठी अधिग्रहीत केलेला टॅंकरचालक विजय यादव हा मूळचा बिहार येथील आहे. त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून त्यांच्यावर तेथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तरीही, कुटुंबीयांची पर्वा न करता सोलापूरकरांच्या मदतीसाठी त्याने अहोरात्र टॅंकर चालविला आणि अकरा तास ड्रायव्हिंग करीत टॅंकर सोलापुरात पोच केला. सिव्हिल हॉस्पिटलसाठी दोन टन ऑक्‍सिजन दिला, तर उर्वरित ऑक्‍सिजन सिलिंडरमध्ये भरून वितरीत करण्यात आला. त्या टॅंकर चालकाचे जिल्हाधिकारी शंभरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांनी कौतुक केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख