vidhansabha gondhal
vidhansabha gondhal

भास्कर जाधव यांनी अनिल कुंबळेचे रेकाॅर्ड मोडले... एकाच इनिंगमध्ये 12 बळी!

`मॅन आॅफ द मॅच` भास्कर जाधव ठरले.

मुंबई : विधीमंडळातील आजचा दिवस गाजला चिपळूणच्या भास्कर जाधवांमुळे. विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातील पहिल्या दिवसाचे `मॅन आॅफ द मॅच` हे भास्करराव ठरले. (Bhaskar Jadhav Man of Match on the first day of Monsonn Assembly Session) विधानसभेचे कामकाज सुरू होताच भास्करावांचा जो चढा सूर लागला तो कामकाज संपेपर्यंत कायम होता. त्यांच्या तोंडाच्या दांडपट्ट्याने विधीमंडळ कामकाजातील तगडे खेळाडू समजले जाणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सुधीर मुुनगंटिवार (Sudhir Mungantiwar) हे देखील कोेमेजून गेले.

भास्करराव हे आधीच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2004 मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतानाही सेना नेतृत्त्वावर जहाल टीका केली होती. राष्ट्रवादीत ते राज्यमंत्री, मंत्री, प्रदेशाध्यक्ष झाले. 2019 मध्ये पुन्हा सेनेत येऊन बस्तान मांडले. त्यांच्या या स्वभावाचा पुरेपूर फायदा सरकारी पक्षांनी उचलला.

कामकाजाची सुरवात सकाळी एमपीएसीच्या प्रश्नावरून झाली. त्याच वेळी फडणवीस आणि त्यांच्यात खटके उडू लागले. भास्करराव अशा काॅमेंट करू लागले की त्यांना आवरण्याची विनंती फडणविसांना उपाध्यक्षांकडे करावी लागली. `भास्करराव हे माझे मित्र आहेत. त्यांना तालिका सभापती म्हणून घ्यावे किंवा मंत्री करावे. म्हणजे ते शांत बसतील,`` असा टोमणा फडणविसांनी मारला. तरीही भास्करराव बधले नाहीत. फडणविसांनंतर मुनगंटिवार बोलायला उभे राहिले. त्यांच्याही भाषणात भास्करराव अडथळे आणू लागले. मुनगंटिवार चिडले आणि अनिल देशमुख यांचा उल्लेख करून त्यांच्यासारखी गत होईल, अशा आशयाचा इशारा त्यांनी दिला. त्यावरूनही गदारोळ झाला. भास्कररावांच्या मदतीला नाना पटोले आले आणि मुनगंटिवार हे धमकी देत असल्याचा आरोप केला. शेवटी उपाध्यक्षांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.

विविध विषयांवरील स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नाकारले. त्यानंतर भास्करराव हेच तालिका सभापती म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले. ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने डाटा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मंत्री छगन भुजबळ मांडण्यासाठी उठले आणि विरोधी पक्षाकडून विविध आयुधे उपसण्यात आली. या ठरावाची नोटीस नाही, कामकाज नियमानुसार नाही, असे अनेक मुद्दे फडणवीस यांनी मांडले. फडणवीस हे आक्षेप घेताना ते एका कलमाचा क्रमांक सांगण्याचे कसे चुकले, हे देखील भास्कर जाधवांनी दाखवून दिले. फडणवीस यांचे मुद्दे फेटाळून भास्कररावांनी भुजबळ यांना ठराव मांडण्यास सांगितले. भुजबळ हे ठराव मांडत असतानाच विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. भास्करराव हे भुजबळांना ठरावावरील उत्तराचे मुद्दे थांबवून प्रत्यक्ष ठराव मांडा, असा आग्रह धरत होते. शेवटी त्यांनीच भुजबळांना थांबवून ठराव मांडण्यास घेतला. त्याच वेळी विरोधी पक्ष आम्हाला आमची बाजू मांडू द्या, असा आग्रह धरत होता. भास्कररावांनी त्याकडे दुर्लक्ष करत ठराव मताला टाकला आणि मंजूर झाल्याचे जाहीर केले. तेथेच खरा गोंधळ उडाला. आमदार संजय कुटे, गिरीश महाजन हे व्यासपीठावर चढले. संजय कुटे यांनी अध्यक्षांसमोरील माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी भास्कर जाधवांनी त्यांना इशारा दिला. कुटेंनी तो माईक सोडून दिला. त्यानंतर सभागृह पंधरा मिनिटांसाठी तहकूब झाले. 

या गोंधळानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांच्या केबिनमध्ये बैठक झाली आणि तेथे गेलेल्या भास्कररावांना भाजप सदस्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. भास्करारावंनी तेथे काय घडले, याचा सारा वृत्तांत रोखठोक भाषेत सभागृहात सांगितला. लोकशाहीला काळीमा कसा फासला गेला. आईबहिणीवरून मला शिव्या दिल्या गेल्या, हे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या कथनानंतर लगेचच भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. संसदिय कामकाज मंत्री अनिल परब यांनी तो ठराव मांडला आणि सत्ताधारी आघाडीचे बहुमत असल्याने मंजूर झाला. दुसरीकडे निलंबित झालेल्या आमदारांनी भास्कर जाधवांनीच शिवीगाळ केल्याचा प्रत्यारोप दिवसभर लावून धरला होता.  

बारा आमदारांवरील कारवाईनंतर विरोधी पक्षाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. फक्त सत्ताधारी पक्षाचेच नेते आणि आमदार सभागृहात उरले. भास्करराव हे अध्यक्षपदाच्या खुर्चीवर दिवसभर राहिले. अजित पवार, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आदी मंत्र्यांनी विधेयके मांडली. तेव्हाही भास्कररावांनी स्पष्टपणे काही सूचना केल्या. अजित पवार यांनी जीएसटी बदलाविषयीचे विधेयकाची मांडणी केली. त्यावेळी अजितदादांचे कौतुक करत आपण विधेयक का मांडतो आहोत, हे प्रत्येक मंत्र्याने अजितदादांप्रमाणे सभागृहाला समजावून सांगायला हवे, असे स्पष्ट केले. सुभाष देसाई यांनी मराठी राजभाषेविषयी विधेयक मांडले. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यात भाषा अधिकारी नेमणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी भास्करराव यांनी भाषेची जाण असलेली अधिकारी जिल्ह्यांमध्ये नेमा, असे म्हणत देसाईंनाही टोचले.

अनुभवी आमदार काय असतो, हे भास्कररावांनी आज दाखवून दिले. तसेच राजकीय कुरघोडीतही आपण कमी नाही हे पण सरळपणे भाजपला सांगितले. अनिल कुंबळे,  जिमी लॅकर या गोलंदाजांन एकाच इनिंगमध्ये दहा बळी घेतल्याचा विक्रम आहे.  भास्कर जाधवांनीही अध्यक्ष म्हणून पहिल्याच इनिंगमध्ये 12 बळी घेतले, हा सोशल मिडियात मेसेज फिरला तो काही उगीच नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com