भालकेंना श्रेय नको; म्हणून फडणवीसांनी मंगळवेढा सिंचन योजनेतून १५ गावे वगळण्याचे पाप केले - Bhagirath Bhalke criticizes Fadnavis government over Mangalvedha Upsa Irrigation Scheme | Politics Marathi News - Sarkarnama

भालकेंना श्रेय नको; म्हणून फडणवीसांनी मंगळवेढा सिंचन योजनेतून १५ गावे वगळण्याचे पाप केले

हुकूम मुलाणी
मंगळवार, 6 एप्रिल 2021

उच्च न्यायालयाने निधी देण्याचे आदेश देऊनही शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने निधी दिला नाही.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार भारतनाना भालकेंनी आजारी असतानादेखील आपली आमदारकी पणाला लावली. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने भालके यांना श्रेय नको; म्हणून या योजनेतील 15 गावे आणि 1 टीएमसी पाणी कमी करण्याचे पाप केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले.

मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत भालके बोलत होते. या वेळी नंदकुमार पवार, लतिफ तांबोळी, भारत बेदरे, तुकाराम कुदळे, तुकाराम भोजने, बंडू गायकवाड, मारुती वाकडे, सुरेश कोलेकर, मुरलीधर सरकले, संतोष पवार, दौलत माने आदी उपस्थित होते. 

भगिरथ भालके म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी (स्व.) आमदार भारतनानांनी मंगळवेढा उपसा सिंचन मार्गी लागावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे या योजनेला निधी देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. उच्च न्यायालयाने निधी देण्याचे आदेश देऊनही शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने निधी दिला नाही. तसेच, या योजनेतील 15 गावे व एक टीएमसी पाणी कपात करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले. 

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत विधान परिषदेचे पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ठेकेदारीसाठी भेटणारे समाधान आवताडे यांनी त्या वेळी तोंड का उघडले नाही. उलट त्यांनी भालके यांना श्रेय जाते; म्हणून योजना लटकविण्यास फडणवीसांना सांगितले. या योजनेमधील वगळलेली गावे येड्राव, जित्ती, खवे, भाळवणी, निंबोणी, रेड्डे, जालिहाळ, हाजापूर, सिध्दनकेरी, पाटकळ, गणेशवाडी, हिवरगाव, मेटकरवाडी, शिरशी व शेलेवाडी अशी आहेत. ही वगळलेली गावे (स्व.) भारतनानांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुनश्च मंगळवेढा उपसा सिंचन योजनेत समावेश करून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली, असेही भगिरथ भालके म्हणाले. 

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे भूमिपूत्र म्हणून मते मागत आहेत, मग ही वगळलेली 15 गावे काय पाकिस्तानातून आले आहेत काय? त्याबद्दल मूग गिळून गप्प बसत आहेत. भाजपच्या उमेदवाराने लहानपणापासून पाणीप्रश्न ऐकला होता; परंतु  भारतनानांनी तो पाणी प्रश्न ऐरणीवर आणून राज्य सरकारच्या समोर मांडत येथील शेतकऱ्यांच्या भावना समजून तो प्रश्न मार्गी लावला. पण, भाजप उमेदवार मात्र निव्वळ राजकीय फायद्यासाठी याबाबत अज्ञानीपणे बोलत आहे, त्यामुळे ह्या योजनेची पूर्ण माहिती घेऊन मगच त्यांनी भाष्य करावे. पाणी प्रश्नासाठी कोणी काय केले, याची माहिती जनेतला आहे, असा टोलाही भालके यांनी आवताडे यांना लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख