...तर बाळासाहेब ठाकरे पुणेकर झाले असते..

बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यात फार काळ व्यतीत करता आला नाही तरी त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम होते.
BT23F.jpg
BT23F.jpg

पुणे : बाळासाहेब ठाकरे आणि पुणे यांचा तसा जवळचा संबंध. बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा. पुण्यातल्या सदाशिव पेठेत त्यांचा जन्म झाला. जन्मानंतर सुमारे दोन-अडीच वर्षे ते पुण्यात होते. मात्र, वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी अंमलात आणला नसता तर कदाचित बाळासाहेब ठाकरे पुणेकर झाले असते.

सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीटवरून ज्ञान प्रबोधिनीकडे जाताना सार्थक नावाची एक नवी इमारत दिसते. याच जागेवर पूर्वी नातूंचा आणि त्यानंतर मालकी झालेल्या दातारांचा वाडा होता. या वाड्यात २३ जानेवारी १९२६ रोजी बाळासाहेबांचा जन्म झाला. या वाड्याच्या समोरच त्यावेळी इंदिराबाई खाडे यांचे मॅटर्निटी होम होते. या मॅटर्निटी होममध्ये त्यांचा जन्म झाला. या भागातील जुने वाडे जाऊन आता मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. ज्या जागेत आता सार्थक नावाची रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधण्यात आली. त्या जागी कधीकाळी मोठा वाडा होता. या वाड्यात प्रबोधनकारांचे कुंटुंब राहात होते. याच परिसरात प्रबोधनकारांच्या प्रबोधन या मासिकाचे कार्यालय होते. 

महात्मा फुले यांचे सुधारणावादी व जातविरहित विचारांचा पुरस्कार केल्याने प्रबोधनकारांना सामाजिक त्रासाला याच पुण्यात सामोरे जावे लागले. जेधे-जवळकर व श्रीधरपंत टिळकांचा सहवास या काळात प्रबोधनकारांना लाभला. श्रीधरपंत हे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव. प्रबोधनकारांच्या सामाजिक कामाचे श्रीधरपंतांना विशेष कौतुक वाटत असे. त्यांना प्रबोधनकारांबद्दल आदर होता. पुण्यात असताना प्रबोधन हे मासिक होते. पुढे मुंबईत गेल्यानंतर त्याचे पाक्षिकात रूपांतर करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या व्यक्तीमत्वाचे गारूड घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यात फार काळ व्यतीत करता आला नाही तरी त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अनेकदा त्यांना भाषणांमधून ते व्यक्त केले आहे. 

मार्मिकचा काळ आणि शिवसेनेची स्थापना यानंतर त्यांचा राज्यभर प्रवास घडे. या काळात ते पुण्यात बऱ्यादा मुक्कामाला असत.जंगली महराज रस्त्यावरील सन्मान हॉटेल हे बाळासाहेबांचे एकेकाळचे मुक्कमाचे ठिकाण. पुण्यात आल्यानंतर ते या हॉटेलात उतरत. निवांत वेळ मिळाल्यानंतर जंगली महराज रस्ता आणि डेक्कन परिसरात फेरफटका मारत मित्रांबरोबरच्या गप्पा हे त्यांचे विशेष आवडीचे होते. कर्वे रस्त्यावरील आलुरकर म्युझिक हाऊस हे त्यांचे आणखी एक आवडीचे ठिकाण. जुन्या कॅसेट आणि संगीताचे जुने संदर्भ यासाठी ते आलुरकरमध्ये तासनतास बसत. त्यांच्या सुरवातीच्या काळात पुण्यात आल्यानंतर आलुरकर म्युझिक हाऊसला भेट दिली नाही, असे कधीच होत नसे. पुण्यातला निवांतपणा त्यांना आवडता असल्याने ते अधूनमधून पुण्याला येत. मुंबईतली राजकारणातील धामधूम नित्याचीच होती, त्यामुळे पुण्यात आल्यानंतर निवांत वेळ घालवून मित्रांबरोबर गप्पा मारणे आणि फिरण्यात त्यांना विशेष आनंत वाटे. 

१९९० नंतरच्या काळात सरकारी सुरक्षेचे मोठे कवच त्यांच्या भोवती होते. मात्र, त्याआधीचा काळात पुण्यात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचे काम दिवंगत माजी खासदार मोहन रावले व माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर असे. हे दोघे सतत त्यांच्यासोबत राहात असत, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार हरीष केंची यांनी सांगितली. अनेकवेळा आपल्या भाषणात पुणेरीपणावर ते खरपूस टीका करीत. मात्र, त्यांचे पुण्यावर मनापासून प्रेम होते. कितीही म्हटले तरी आपल्या जन्मगावाद्दल माणासाला आतून ओढ असतेच. ती ओढ बाळासाहेबांना पुण्याबद्दल होती.
Edited  by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com