माणुसकीचा नवा अध्याय..भाजपचे माजी खासदार संजय काकडेंच्या शरद पवारांना शुभेच्छा! - Former bjp mp sanjay kakade wishes sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

माणुसकीचा नवा अध्याय..भाजपचे माजी खासदार संजय काकडेंच्या शरद पवारांना शुभेच्छा!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 डिसेंबर 2020

मी भाजपाचा असूनही शरद पवारांबद्दल लिहितोय याचं अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु, कर्तृत्ववान माणसांचे कौतुक करणं ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार नावाचा दबदबा आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या इतका अनुभव आणि कृषी, उद्योग, खेळ, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची खडान् खडा माहिती असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. शरद पवार साहेबांचा अनेक विषयांतील अभ्यास, अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेले दिसतात. 

ज्येष्ठ नेते शरद पवार आज वयाची 80 वर्षे पूर्ण करीत असून त्यांना भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत. 'योद्धा @ 80 : लोकनेते शरद पवार' या मथळ्याखाली या शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय क्षेत्रात काकडें च्या शुभेच्छांची जोरदार चर्चा असून या गोष्टीचे कौतुकही होत आहे. कारण, महाराष्ट्रात नेहमीच ही चांगली परंपरा राहिली आहे. राजकीय मतभेद असताना मनभेद कधीच जाणवले नाहीत. सुरुवातीपासूनचं हे ‘कल्चर’ आजही कायम आहे आणि काकडेंच्या शुभेच्छातून माणुसकीचा नवा अध्याय मांडला गेला आहे. 

माजी खासदार संजय काकडे यांनी शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छांचे वैशिष्ठ्य म्हणजे पवारांचे राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर उल्लेख शुभेच्छामध्ये केला आहे.
 
शरद पवार यांचं जीवन हे अनेक घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. 1967 मध्ये ते राज्याच्या राजकारणात विधानसभेचे आमदार म्हणून आले. त्याअगोदरही ते युवक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांची कामाची पद्धत, जनसंपर्क ठेवण्याची कला यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीतच शरद पवार लोकप्रिय झाले. 1978 मध्ये पुलोद सरकारचा प्रयोग महाराष्ट्रात झाला आणि शरद पवार या तरुण नेत्याची निवड मुख्यमंत्री म्हणून झाली. यावेळी ते अवघ्या 38 वर्षांचे होते.
 
दळणवळण व संपर्काची अपुरी साधनं असताना शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत होते. हे कौतुकास्पद यासाठी आहे की, आजच्या काळात सर्व सुविधांयुक्त गाड्या असताना, हेलिकॉफ्टर व विमानाची सोय असताना देखील नेते दमायला होतात. शरद पवारांनी संपर्कातून जोडलेला महाराष्ट्र त्यांच्या पडत्या काळात उपयोगी पडलेला दिसतो. जून 1980 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी शरद पवारांचे 54 आमदार निवडून आले होते.

देशात इंदिरा गांधींची लाट पुन्हा आली आणि महाराष्ट्रात देखील त्यांचे 187 आमदार निवडून आले होते. बहुमतातलं सरकार इंदिरा काँग्रेसनं स्थापन केले खरे पण, शरद पवारांबरोबरील आमदार यावेळी विचलित झाले. पवार साहेब लंडनला गेलेले असताना महाराष्ट्रातल्या या सहकाऱ्यांनी पवारांची साथ सोडली व सहा-सात आमदार वगळता इतर काँग्रेसबरोबर गेले. सर्व संपलं असं वाटत असताना पवारांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे गेले. प्रचंड आत्मविश्वास, सातत्यपूर्ण कष्ट आणि दांडगा जनसंपर्क राखत शरद पवारांनी साधारणपणे तेवढेच आमदार पुन्हा निवडून आणले.

2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेली विधानसभा निवडणक आपण सर्वांनी पाहिली. यावेळी भाजपा-शिवसेना महायुतीचा रथ रोखणं अवघड असताना विरोधक नावाला तरी उरतील की नाही असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु, शरद पवारांनी निकराने लढा दिला. साताऱ्यामधली त्यांची पावसाची सभा नवी ऊर्जा देऊन गेली आणि विरोधकांचं संख्याबळ काही प्रमाणात का होईना वाढलं... हे मान्य करायलं हवं, असे माजी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे. 

राजकारणातील मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. 1978 सालचं पुलोद सरकार बनवतानाच्या घटना असोत की 2019 मध्ये शिवसेनेला महायुतीतून बाहेर घेऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणं असो... शरद पवारांनी राजकीय डावपेच यशस्वी करून दाखवले.  ज्या वयात आराम करायचा, घरात बसायचं त्या वयात पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. सगळ्या आव्हानांना उत्साहानं सामोरं गेलेले शरद पवार आपण पाहतोय. भलेही पवार साहेबांबरोबर राजकीय मतभेद असतील पण, त्यांचा हा उत्साह, त्यांची ऊर्जा आणि कामाचा उरक आपल्या सर्वांना निश्चितपणे प्रेरणा देतो, असेही काकडे म्हणाले आहेत. 

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. आणि हा विचार सर्वदूर पोहोचवायचा असेल तर, नियमितपणे त्यासाठी काही ना काही भरीव कार्य करावं लागणार. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना घेतला. त्याची राजकीय किंमत त्यांना मोजावी लागेल असा मतप्रवाह असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय शरद पवार यांनीच घेतला. मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात त्यांनी लागू केले. हा निर्णय घेणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते. खरं तर अशी अनेक उदाहरणं देता येतील.
 
देशातील सर्वाधिक जनता कृषी व संबंधीत क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्यांनी केंद्रातील युपीए 1 व 2 सरकारमध्ये कृषी खात्याचं मंत्रिपद घेतलं. जाणीवपूर्वक हे खातं घेऊन या खात्यामध्ये अनेक सुधारणा त्यांनी केल्या. संशोधन, उत्पादन आणि विक्री यासाठी अनेक निर्णय घेण्यास तत्कालिन सरकारला भाग पाडले. परिणामी शेतीचं उत्पादन वाढलं, जीडीपीमधील कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा वाढला. दहा वर्षांच्या त्यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात देश गहू, तांदूळ, फळे व इतर अनेक उत्पादनात स्वावलंबी तर झालाच परंतु, निर्यातक्षम देखील झाला. त्यांचं हे योगदान अनमोल आहे. 

शरद पवार हे समाजाशी निगडीत सर्व क्षेत्रात आढळतात. त्यांचा क्रिकेटशी काय संबंध म्हणून अशी अनेकदा टीका झाली. मात्र, शरद पवार यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे या टिकांकडे दुर्लक्ष केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झालेले शरद पवार नंतर बीसीसीआयचे आणि त्यानंतर थेट आयसीसीचे पण अध्यक्ष झाले. देशाचे कृषी मंत्रिपद सांभाळताना ते क्रिकेट संघटनेचं काम पाहत होते. विशेष म्हणजे ते अध्यक्ष झाल्यानंतर अनेक सुविधा निर्माण केल्या. निवृत्त क्रिकेटपट्टूंना भरघोस असे निवृत्ती वेतन सुरु केले. क्रिकेटपटूच्या निधनानंतर त्याच्या विधवा पत्नीला देखील हा लाभ सुरु केला. 

भारतात क्रिकेटमध्ये अधिक पैसा येतो परंतु, इतर खेळांमध्ये तो नाही. म्हणून इतर खेळांच्या विकासासाठी शरद पवारांनी ते अध्यक्ष असताना बीसीसीआय ने खर्च करायची रक्कम अनेक पटींनी वाढवली. त्यातूनच कब्बड्डी, खो-खो, कुस्ती आणि इतर खेळांचा विकास अधिक वेगाने सुरु झालेला आपण पाहतोय. शरद पवारांचा उद्योग जगताशी जवळून संबंध राहिला आहे. शेतीवर निस्सिम प्रेम असले तरी शेतीबरोबरच उद्योगाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो असा विचार असलेले ते नेते आहेत. 

शेतीवरील भार कमी करताना उद्योगाचं जाळं वाढलं पाहिजे. आणि त्यासाठी शरद पवारांनी सतत प्रयत्न केल्याचं दिसतं. स्थानिक पातळीपासून ते अगदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उद्योजकांना आलेल्या अडचणी किंवा अडचणीचे ठरणारे नियम यातून मार्ग निघावा म्हणून शरद पवारांनी अगणितवेळा मदत केली आहे.
 
शेतकरी, कामगार, मजूर, शिक्षक, मध्यमवर्गीय, दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, उद्योजक आणि सर्व पक्षातील राजकारणी... या सर्वांना शरद पवार आपले वाटतात, जवळचे वाटतात हेच शरद पवारांच्या आजवरच्या जगण्याचं फलित आहे. शरद पवारांबरोबर अनेकांचे राजकीय मतभेद आहेत. परंतु, शरद पवारांनी कधीही कुणाला मदत करताना, मार्गदर्शन करताना ते मतभेद आडवे येऊ दिले नाहीत. अशा उमद्या मनाचे लोकनेते शरद पवार 80 वर्षांचे होत आहेत. आजही ते त्याच जोमाने कार्यरत आहेत. याचं कौतुक सर्वांना आहे. असे सांगताना माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, "मी भाजपाचा असूनही शरद पवारांबद्दल लिहितोय याचं अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु, कर्तृत्ववान माणसांचे कौतुक करणं ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे, भले तो विरोधक असो. पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभो व ते शतायुषी होवो... याच मन:पूर्वक शुभेच्छा!"
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख