ते पत्र लिहून आपल्याकडून चूक झाली : हुसेन दलवाई 

तुमच्या एका पत्रामुळे येथील कुटुंबे देशोधडीला लागली.
We made a mistake in writing that letter : Hussein Dalwai
We made a mistake in writing that letter : Hussein Dalwai

चिपळूण : कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी गोवळकोट येथील बाधित कुटुंबीयांच्या राहत्या घराची पाहणी केली. पुनर्वसन थांबविणारे दलवाई यांचे पत्र त्यांना या वेळी वाचून दाखविण्यात आले. त्यावर आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य करून ते पत्र सत्यता न पडताळता अनावधानाने पाठवले गेल्याचे दलवाई यांनी कबूल केले. पुनर्वसनाच्या लढ्यामध्ये मी बाधित कुटुंबीयांसोबत तसेच पुनर्वसन समितीसोबत असल्याचे दलवाई यांनी सांगितले. 

घरांची विदारक परिस्थिती पाहून राज्य सरकारने 2010 मध्ये निश्‍चित केलेली जागाच योग्य आहे. या जनलढ्याला आपला पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले. 15 कुटुंबांचे पुनर्वसन कोयना प्रकल्पाच्या जागेतच होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चिपळूण दौऱ्यावर आलेल्या दलवाई यांनी गोवळकोट कदम बौद्धवाडीतील विहारामध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व ग्रामस्थांशी दीर्घ चर्चा केली. 

या वेळी त्यांच्याबरोबर लियाकत शहाही होते. दरम्यान, समितीच्या वतीने उपाध्यक्ष सुरेश कदम, सचिव उदय जुवळे, निवृत्त सैनिक भीम मार्शल संतोष मोहिते, सदस्य प्रशांत पोतदार यांनी विचार मांडले. 

आपली जुनी भूमिका बदलून, सरकारने पूर्वी निश्‍चित केलेल्या जागी पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दलवाई यांनी दिले. या वेळी समितीचे अध्यक्ष भगवान बुरटे, उपाध्यक्ष किरण बांद्रे, सुरेश कदम, सहसचिव श्रीराम शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

येत्या मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक 

हुसेन दलवाई यांनी गोवळकोट धक्का मैदानाशेजारील शासकीय मालकीची जागा स. नं. 127 व 127 (अ) या पूर्वी सरकारने निश्‍चित केलेल्या जागेचीही पाहणी केली आणि पुनर्वसनासाठी हीच जागा योग्य असल्याचे मान्य केले. येत्या मंगळवारी (ता. 19) जिल्हाधिकारी यांच्याबरोबर एक तातडीची बैठकही ठरविली. लवकरात लवकर या ठिकाणी ग्रामस्थांसाठी चांगल्या दर्जाची घरे उभारली जावी, त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करण्याची मागणी दलवाई यांनी केली. 

तुमच्या एका पत्रामुळे..एक पिढी बरबाद 

समितीचे पदाधिकारी सुभाष जाधव यांनी ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या. तुमच्या एका पत्रामुळे येथील कुटुंबे देशोधडीला लागल्याचे तसेच त्यांची एक पिढी बरबाद झाल्याचे दलवाई यांच्या निदर्शनास आणून दिले. दलवाई यांनी 12 ऑगस्ट 2011 ला सरकारी यंत्रणेला दिलेले पत्र जाधव यांनी या वेळी वाचून दाखवले. या वेळी 26 जानेवारीला होणाऱ्या उपोषणाला दलवाईनी पाठिंबा जाहीर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com