मी आज येऊन टपकलेलो नाही, असे म्हणणाऱ्यां संभाजीराजेंच्या मनात काय चाललयं?

संभाजीराजे आता नव्या राजकीय भूमिकेत तर जात नाही ना, असेही बोलले जात आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-05T163345.311.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-05T163345.311.jpg

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhaji Raje पुन्हा चर्चेत आले आहेत. विविध नेत्यांशी गाठीभेटी, नव्या राजकीय समीकरणांची सुरवात, मराठा संघटनांना Maratha reservationएकत्र आणण्याचा प्रयत्न अशा विविध पातळ्यांवर ते सक्रिय झाले आहेत. सहा जून रोजी शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याची मोहीमही त्यांनीच सुरू केली. संभाजीराजे आता नव्या राजकीय भूमिकेत तर जात नाही ना, असेही बोलले जात आहे. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश!

शिवरायांचे तेरावे वंशज 
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याचे त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या निधनानंतर विभाजन झाले व  छत्रपतींच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती व सातारचे छत्रपती. यापैकी सातारची गादी दत्तक वारस नामंजूर करुन इंग्रजांनी इ.स. १८४८ साली खालसा केली व आपल्या साम्राज्यात सामील करुन घेतली. पण कोल्हापूरच्या छत्रपतींची गादी ब्रिटिशांना खालसा करता आली नाही. याच कोल्हापूर गादीचे संभाजीराजे हे वारसदार असून ते शिवरायांचे थेट तेरावे वंशज आहेत. 

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही छत्रपतींचे स्वतंत्र राज्य
ब्रिटिश काळातही कोल्हापूरचे छत्रपती स्वतंत्र राहिले. इतकेच नव्हे तर १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कोल्हापूरच्या छत्रपतींचे राज्य हे एक स्वतंत्र राज्य होते. पण इ. स. १९४९ साली छत्रपती शहाजी महाराज (राजर्षि शाहू महाराजांचे नातू व संभाजीराजेंचे आजोबा) यांनी कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन केले. विलीनीकरणानंतर छत्रपतींच्या हातून काही विशेष अधिकार वगळता संपूर्ण राजसत्ता निघून गेली. इतरांप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे सर्वसामान्य नागरिक झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राजघराणी राजकारणात सक्रीय  झाली. मात्र कोल्हापूरचे राजघराणे यास अपवाद ठरले. छत्रपती शहाजी महाराज हे राजकारणाऐवजी इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये उतरले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. अर्थातच जोडीला समाजकारण सुरुच होते पण ते राजकारणात मात्र सक्रीय झाले नाहीत.

संभाजीराजेंच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संसदेत जाणाऱ्या पहिल्या सदस्या म्हणजे राजमाता विजयमाला राणीसरकार. १९६७ मध्ये भारताचे माजी उपलष्करप्रमुख जनरल एस. पी. पी. थोरात यांचा पराभव करुन विजयामाला राणीसरकार या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यांच्यानंतर संभाजीराजेंचे वडील कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज हे देखील समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय होते. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. त्यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे हे २००४ मध्ये कोल्हापूर शहरातून वयाच्या २७ व्या वर्षीच आमदार म्हणून निवडून आले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर संभाजीराजे लोकसभा निवडणूकीस उभे राहिले, पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव संभाजीराजेंच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यांच्या पराभवाचे कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वापार चालत आलेले पाडापाडीचे राजकारण. 

कोल्हापूरच्या नेत्यांनी कंबर कसली
संभाजीराजे त्यावेळी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होती. असे झाले असते तर स्वतंत्र भारताच्या संसदीय व राजकीय इतिहासातील ती एक अभूतपूर्व  घटना ठरली असती. संभाजीराजे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाच होता, पण असे घडणार नव्हते. किंबहुना संभाजीराजेंच्याच पक्षातील कोल्हापूर जिल्ह्याच्या कारभाऱ्यांना तसे घडून द्यायचे नव्हते. कारण यामुळे छत्रपतींचे वारस म्हणून आधीच लोकप्रिय असलेल्या संभाजीराजेंचे राजकीय महत्त्व अनन्यसाधारण वाढून प्रस्थापित कारभाऱ्यांचे स्थान कायमचे डळमळीत झाले असते. छत्रपती राजकारणात आल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इतर नेत्यांची जी अवस्था झाली ती वेळ स्वतःवर येऊ नये यासाठी कोल्हापूरच्या नेत्यांनी कंबर कसली होती आणि याचे परिणाम म्हणजे संभाजीराजेंच्या विरोधात उभे ठाकले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक. 

मराठा आरक्षणाबद्दल जनजागृती
पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या तरुण संभाजीराजेंसमोर अर्धी हयात राजकारणात घालवलेले मुरब्बी राजकारणी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे तगडे आव्हान उभे राहिले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. संभाजीराजेंचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मते हि जवळपास चार लाख होती. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत पराभवास सामोरे जावे लागल्यानंतरही खचून न जाता संभाजीराजे अधिक जोमाने काम करु लागले. २००९ च्या पराभवानंतर त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर राजवाड्यात परतून ऐषोआरामाचे जीवन जगायचे किंवा जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायचे. पण त्यांनी दुसरा पर्याय निवडला. निवडणूक निकालानंतर काहीच दिवसांत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होता. दरवर्षीप्रमाणे याही सोहळ्यास राजे उपस्थित राहिले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराभवानंतर संभाजीराजे कोल्हापूरातून बाहेर पडले व मराठा आरक्षणाबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. 

राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांच्या छुप्या विरोधामुळेच पराभूत
संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांनी केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित राहणे हेच अयोग्य ठरले असते. सातारा व कोल्हापूर या दोन राजघराण्यांप्रती महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेले नितांत प्रेम, आदर व अपेक्षा तिळमात्रही कमी झालेल्या नाहीत. त्यानंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात असताना कोल्हापूरात मोठे रणकंदन माजले आणि याचाच धागा पकडत शिवसेनेने ज्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजिर खुपसला त्यांना नेस्तनाबूत करुया असे आवाहन करत संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले. संभाजीराजेंनी ते निमंत्रण स्वीकारले नाही. पण, या घडामोडींमुळे संभाजीराजे हे लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या छुप्या विरोधामुळेच पराभूत झाले.

मोर्चाचे सामूहिक नेतृत्व संभाजीराजेंकडे
मराठा आरक्षणाच्या लढ्याला एकसंधपणा नव्हता. संभाजीराजे छत्रपती या लढ्यात उतरले आणि मराठ्यांच्या सर्व संघटनांना त्यांनी एका छत्राखाली आणले. या संघटनांनी आरक्षण लढ्याचे नेतृत्व राजेंकडे सोपवले. संभाजीराजेंनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले व ठिकठिकाणी सभा घेऊन आरक्षणाबद्दल मराठा समाजात जनजागृती केली.संभाजीराजेंच्या प्रत्येक सभेस हजारो लोकांची गर्दी उसळायची. शाहू महाराजांनी मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे कोल्हापूर संस्थानात मराठ्यांची सामाजिक, शैक्षणिक व  प्रशासकीय क्षेत्रात झालेली उन्नती समजावून देत आरक्षणाचे महत्व व आज मराठा समाजास असलेली आरक्षणाची गरज समाजाच्या मनावर त्यांनी बिंबवली. शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून आरक्षणाबद्दल समाजाचे मतपरिवर्तन घडवून आणून संभाजीराजेंनी चार एप्रिल २०१३ रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे एक लाख मराठ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढला. यामध्ये ८४ हून अधिक मराठा संघटना सामील झाल्या होत्या व या मोर्चाचे सामूहिक नेतृत्व संभाजीराजेंकडे देण्यात आले होते. मराठा समाजाची खरी ताकद व एकजूट दाखवून देण्यामध्ये संभाजीराजे यशस्वी झाले. या मोर्चामुळे राज्यसरकारला मराठा आरक्षणाविषयी गांभिर्याने विचार करणे भाग पडले व पुढच्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केले.

पुन्हा लढा उभा करण्याची गरज 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण निर्णय रद्द केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. जर माझ्या राजीनाम्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्या राजीनामा देतो अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा लढा उभा करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून त्यांनी कोल्हापूरातून दौऱ्यास सुरवात केली आहे. हा दौरा पंढरपूर -सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-नांदेड असा आहे. आरक्षणप्रश्नी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हा त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मराठा समाज तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे तर दुसरीकडे यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोदींना वारंवार भेट मागूनही वेळ दिलेली नाही.

पुढील राजकीय समीकरणे कशी जुळवायची..

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त झालेले संभाजीराजे यांचे खऱे तर राजकारणात लांबची झेप घेण्याचे स्वप्न होते. सामाजिक अंगाने बांधणी करत ते राजकारणात पुढे गेले. पण भाजपच्या अधिकृत व्यासपीठावर जाण्याचे टाळत त्यांनी आपण कोणा पक्षाच्या विचारसरणीला बांधील नसल्याचेही स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राजे पुन्हा प्रभाव निर्माण करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कधी विरोधात थेट त्यांनी एल्गार पुकारलेला नाही. त्यामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी जुळवायची, याचे विचार त्यांच्या मनात सुरूच नसतील, असेही नाही.

Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com