सदाभाऊ खोत भाजपची साथ सोडण्याच्या मनःस्थितीत?

पडत्या काळात भाजपने बेदखल करणे, सदाभाऊ खोत यांच्याजिव्हारी लागले आहे. या घडीला प्रदेश भाजपमध्ये सदाभाऊंच्या डोक्‍यावर देवेंद्र फडणवीस यांचा हात असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते अडगळीला पडले आहेत. पुणे पदवीधरमध्ये बंडाच्या निमित्ताने त्यात सुधारणा होते का, याकडे आता लक्ष असेल.
Sadabhau Khot FB
Sadabhau Khot FB

सांगली : इस्लामपूर नगरपालिकेसह वाळवा तालुक्‍याचे राजकारण, जिल्ह्यातील राजकीय धोरण, पक्षातील पदाधिकारी निवडी या पातळीवर आपणास विश्‍वासात घेतले नाही, याचा सल सदाभाऊ खोत यांच्या मनात आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेची उमेदवारी जाहीर करणे असो किंवा केंद्र सरकारच्या शेतमाल धोरणावर परखड शब्दांत टीका करणारे जाहीर निवेदन असो, सदाभाऊंनी भाजपवरील ही नाराजी उघड करायला सुरवात केली आहे. त्यातूनच ते भाजपची साथ सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे. 

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली, मात्र भाजपमध्ये स्वतः जाहीरपणे प्रवेश केला नाही. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिरंजीव सागर खोत यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. वास्तविक, विधान परिषदेचे सदस्य होत असताना सदाभाऊंनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी फारकत घेऊन वाजत-गाजत भाजपचा हात धरलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना भाजप निर्णय प्रक्रियेत डावलत असल्याने ते बंडाच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे.

मात्र, त्याचवेळी रयत क्रांती संघटना हे स्वतंत्र अस्तित्वही ठेवले आहे. भाजपने राज्यमंत्री असताना थोडाफार सन्मान दिला, मात्र तेवढ्यापुरते. उलटपक्षी जिल्ह्यात एकही मंत्री नसताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना येथे पालकमंत्रीपदाची संधी होती. त्याला भाजपच्या बहुतांश नेत्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे सोलापूरच्या सुभाष देशमुख यांना पालकमंत्री करावे लागले. सदाभाऊ साताऱ्याचे सहपालकमंत्री झाले.

राज्यातील भाजपची सत्ता आणि सदाभाऊंचे राज्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांना पूर्णतः बाजूला सारले गेले. इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी सदाभाऊंचा सवतासुभा सुरु झाला. त्यात जिल्हा भाजपकडून पाहुण्या-पैचे राजकारण करत निशिकांत यांना बळ दिले गेले आणि सदाभाऊंना गृहित धरून वाळवा तालुक्‍यात भाजपची रचना केली गेली, असा आरोप सदाभाऊ समर्थकांकडून त्यावेळीही उघडपणे केला गेला.

शिराळा विधानसभा मतदार संघात माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या पराभवानंतर सदाभाऊंवर शंका घेतली गेली. तेथून परिस्थिती आणखी बिघडत गेल्याचे सांगितले बोलले जाते. श्री. नाईक यांच्यासाठी सदाभाऊंनी प्रामाणिकपणे काम केले नाही, असा आरोप केला गेला.  पुणे पदवीधर मतदारसंघातून रयतने प्रा. डी. ए. चौगुले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सदाभाऊंच्या जखमेकडे साऱ्यांचे लक्ष गेले.

ते कण्हत आहेत, विव्हळत आहेत, भाजपने बेदखल केल्याची सल त्यांना बोचते आहे, हे समोर आहे. त्याआधी त्यांनी तेलबिया आयात धोरण आणि कांदा निर्यातील बंदीच्या मुद्यावरून केंद्र सरकारला फटकारे मारणारे निवेदन पाठवले. त्यांनी केंद्राच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भिती व्यक्त केली. हे निवेदन नक्कीच दखलपात्र ठरले. कारण, राज्यमंत्री झाल्यानंतर सदाभाऊंनी भाजपच्या प्रवक्‍त्यांपेक्षा अधिक ताकदीने भाजपची बाजू मांडली होती. 

पडत्या काळात भाजपने बेदखल करणे, त्यांच्या जिव्हारी लागले आहे. या घडीला प्रदेश भाजपमध्ये सदाभाऊंच्या डोक्‍यावर देवेंद्र फडणवीस यांचा हात असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते अडगळीला पडले आहेत. पुणे पदवीधरमध्ये बंडाच्या निमित्ताने त्यात सुधारणा होते का, याकडे आता लक्ष असेल. 

सदाभाऊंना आधी दिले माग बाजूला का केले? 

* चिरंजीव सागर खोत यांची भाजपच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. त्या पदावरून त्यांना दूर करण्यात आले. त्याची कल्पना सदाभाऊंना देण्यात आली नाही. 

* भाजपच्या आजीव सभासद नोंदणीचे अर्ज आणि पैसे सदाभाऊ गटाने जमवले. ते पक्षाकडे जमा केले. पक्षाने ते स्वीकारले नाहीत. सारे अर्ज आणि पैसे परत केले गेले. 

* जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत त्यांनी शिफारस केलेल्या कर्ज प्रकरणांची अडवणूक करण्यात आली. तेथे अध्यक्ष दिलीप पाटील आडवे आले असतील, मात्र उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदाभाऊंसाठी ताकद लावली नाही, असा त्यांचा खासगीत आरोप आहे. 

* अर्थात भाजपने सदाभाऊंना विधान परिषद दिली, राज्यमंत्री केले, कडकनाथ घोटाळ्यावेळी त्यांची पाठराखण केली. या सर्वांमुळे त्यांनी राजू शेट्टींची नाराजीही स्वीकारली होती. मात्र तरीदेखील ते सध्या भाजपवर नाराज आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com