खाशाबांना पद्म न मिळणे, हा महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचा अपमान 

ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक पातळीवरील पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा शुक्रवारी (ता. 14 ऑगस्ट) 36 वा स्मृतीदिन. धीरूभाई अंबानींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला; पण मराठमोळ्या खाशाबांना मात्र अनेक वर्षे मागणी करूनही पद्म पुरस्कार मिळत नाही, हा महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांचा अपमान आहे.
Khashaba jadhav not getting Padma award is an insult to wrestling enthusiasts in Maharashtra
Khashaba jadhav not getting Padma award is an insult to wrestling enthusiasts in Maharashtra

पुणे : 'ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक पातळीवरील पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा शुक्रवारी (ता. 14 ऑगस्ट) 36 वा स्मृतीदिन. धीरूभाई अंबानींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला; पण मराठमोळ्या खाशाबांना मात्र अनेक वर्षे मागणी करूनही पद्म पुरस्कार मिळत नाही, हा महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांचा अपमान आहे. किमान महाविकास आघाडीने तरी पाठपुरावा करून खाशाबांना न्याय मिळवून द्यावा,' अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

फेसबुक पोस्ट करून राजू शेट्टी यांनी ही मागणी सरकारकडे केली आहे. त्यात शेट्टी म्हणतात की बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी 1952 मध्ये आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय, या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बॅंकेकडे गहाण ठेऊन त्याला 7000 रुपये दिले होते. याच खाशाबांनी ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. पण, सरकारला त्या खाशाबांना पद्म पुरस्कार देता येईना. 

"खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्‍यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. सन 1900 मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म पुरस्कार दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला 1948 च्या ऑलिंपिक पूर्वीचे मार्गदर्शन केले. 

त्याचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याच्या वयाच्या 5 व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. महाविद्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळविण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही. खाशाबाने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. त्याने ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचाही निश्‍चय केला होता. 

सन 1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा सहावा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही. पुढील 1952 मधील हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी ते बॉटमवेट गटात (57 किलो) गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली. 

ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील सुंदोपसुंदीमुळे पुढील 1952 च्या ऑलिंपिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही, असे त्याना सांगण्यात आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिंपिकसाठी निवड झाली नाही. या वेळी ते शांत बसले नाहीत, तर याचा खुलासा घेण्यासाठी त्यांनी पतियाळाचे महाराजे यांचेकडे न्यायाची विनंती केली. पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्या विरोधी कुस्तीगीराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली.

या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगीराला चितपट केले आणि त्यांची ऑलिंपिकसाठी निवड झाली. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत. कुटुंबाची पळापळ सुरू झाली. गावात लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय, या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बॅंकेकडे गहाण ठेऊन त्याला 7000 रुपये दिले. त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे निधीसाठी गळ घातली पण त्यांनी फक्त 4000 रुपये दिले. 

गादीवरील कुस्तीत पाय घसरतात. खेळताना दोन चुका झाल्या, त्यामुळे गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले. त्या गटात विविध देशांचे 24 स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनलपर्यंतच्या मेक्‍सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी खाशाबांना ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले, पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले, असे शेट्टी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

"ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक पातळीवरील पहिले पदक मिळवून देणारे (स्व.) खाशाबा जाधव यांचा आज 36 वा स्मृती दिवस त्यांना विनम्र अभिवादन. धीरूभाई अंबानींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. पण, मराठमोळ्या खाशाबांना मात्र अनेक वर्षे मागणी करूनही पद्म पुरस्कार मिळत नाही, हा महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांचा अपमान आहे. किमान महाविकास आघाडी सरकारने तरी पाठपुरावा करून खाशाबांना न्याय मिळवून द्यावा,' अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com