अधिकाऱ्यांनी झेडपीची कामे वाटली पै-पाहुण्यांना! - The work in Solapur ZP was given to the relatives by the officers : Umesh Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

अधिकाऱ्यांनी झेडपीची कामे वाटली पै-पाहुण्यांना!

प्रमोद बोडके
सोमवार, 7 जून 2021

जिल्हा परिषद सदस्यांनासुद्धा कामांसाठी टक्केवारी देण्याची झेडपीत वेळ यावी, यापेक्षा वेगळे दुर्दैव काय असेल?

सोलापूर  : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यातील नेते व्यस्त असताना सोलापूर जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांनी डाव साधला. जलसंधारण विभागाच्या कामासाठी दोन महिन्यांपूर्वी 38 कोटींचा निधी आला होता. या निधीचे तालुकानिहाय व सदस्यनिहाय समान वाटप होणे अपेक्षीत होते. झेडपीतील काही विभाग प्रमुखांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना आणि ठेकेदार असलेल्या पै-पाहुण्यांना सोलापूर झेडपीची अनेक कामे दिली. जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला आलेल्या निधीमध्येही झेडपीच्या काही अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी केला. (The work in Solapur ZP was given to the relatives by the officers : Umesh Patil)
 
जिल्हा परिषदेत आज आल्यानंतर उमेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकेकाळी राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेला टक्केवारीचा भस्म्या आजार झाला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. उमेश पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत टक्केवारी शिवाय कामे होत नाहीत, अशा अनेक तक्रारी यापूर्वीच सदस्यांनी केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील जलसंधारण आणि बांधकाम विभागात असे प्रकार अधिक घडत असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा : दोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात!

जलसंधारण विभागाच्या निधी वाटपात माळशिरस, करमाळा, माढा तालुक्‍याला झुकते माप दिल्याचे निधी वाटपाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जी कामे दिली गेली ती अधिकाऱ्यांच्या पाहुण्याला वाटप केल्याचाही आरोप उमेश पाटील यांनी केला आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाच विभागातील कामाबाबत झालेल्या तक्रारीची चौकशी न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या पाच विभागातील दोन वर्षांच्या कामांबाबत यापूर्वीच ग्रामविकास विभागाकडे माहिती सादर केली आहे. जिल्हा परिषद सदस्यांनासुद्धा कामांसाठी टक्केवारी देण्याची झेडपीत वेळ यावी, यापेक्षा वेगळे दुर्दैव काय असेल?, असे जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख