राजकीय बाप म्हणून तुम्ही सांगाल ते ऐकेन; पण राजकारण सोडून... - Subhash Deshmukh lauded Sushilkumar Shinde's political career | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राजकीय बाप म्हणून तुम्ही सांगाल ते ऐकेन; पण राजकारण सोडून...

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 16 जुलै 2021

बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो.

सोलापूर : ‘‘माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत. राजकीय बाप म्हणून आम्ही सगळे तुमचा सल्ला नक्की ऐकणार. सोलापूरचा नागरिक आणि पुत्र म्हणून तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, फक्त राजकीय सोडून,’’ अशी मिश्किल टिप्पणी माजी सहकार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्याबाबत बोलताना केली. (Subhash Deshmukh lauded Sushilkumar Shinde's political career)

सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे आणि सुभाष देशमुख एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी देशमुख यांनी वरील भाष्य केले. सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण, आता ती राहिली आहे का नाही, हे मलाच माहिती नाही, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी इंदापुरातील कार्यक्रमात व्यक्त केली होती. तो धागा पकडून माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल त्यांना बाप म्हणत गौरवपूर्ण उल्लेख केला. 

हेही वाचा : खडसे, शेट्टी, मातोंडकर, सावंतांच्या नियुक्तीसाठी सरकारचा जोरदार युक्तीवाद 

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत. बापाचं वय झालं की पोराला वाटतं, आत बापाचं काय ऐकायचं. पण, बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, अशा शब्दांत देशमुख यांनी शिंदे यांचं राजकारणातील महत्व अधोरेखित केले. 

सुभाष देशमुख म्हणाले की, राजकीय बाप म्हणून आम्ही सगळे तुमचा सल्ला नक्की ऐकणार. तुमच्या अनुभवाचा आणि संबंधांचा आम्हाला नक्कीच फायदाच होईल. सोलापूरचा नागरिक आणि पुत्र म्हणून तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, फक्त राजकीय सोडून, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी या वेळी केली.

सोलापूरच्या कोटणीस स्मारकात तुम्ही चीनच्या लोकांना घेऊन यावे. तुमच्या पत्राला वजन आहे. तुमचे खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे चीनचे भारतातील राजदूत इकडे येतील. त्यातून कोटणीस स्मारकाचा जगभरात लौकिक होईल, असा आशावादही देशमुख यांनी व्यक्त केला.

आपण खूप चांगलं काम केलं आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर यात्रेला मोठमोठे कलाकार आणले, तर सोलापूरचं चांगलं मार्केटिंग होईल, अशी मागणीही देशमुख यांनी शिंदे यांच्याकडे केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख