भाजपने परिचारकांची ताकद पाठीशी उभी केली; पण आवताडे घरातीलच आव्हान कसे मोडून काढणार?  - Samadhan Avtade's cousin Siddheshwar Avtade also filed nomination papers from Pandharpur constituency | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने परिचारकांची ताकद पाठीशी उभी केली; पण आवताडे घरातीलच आव्हान कसे मोडून काढणार? 

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 30 मार्च 2021

त्यांचा अर्ज समाधान आवताडे यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा होऊ शकतो.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील आमदार प्रशांत परिचारक यांची ताकद मंगळवेढ्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. परिचारक-आवताडे यांना एकत्र आणून राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे आव्हान उभा करण्याचा पक्षाचा पहिला डाव यशस्वी झाला. पण, आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्‍वर यांनी घरातूनच त्यांना ललकारले आहे. तसेच, मतदारसंघातील भालके यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचाही आवताडे यांच्यासमोर मोठा डोंगर असणार आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून समाधान आवताडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा :  पंढरपुरात मोठी घडामोड : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचा पोटनिवडणुकीत अधिकृत उमेदवार 

समाधान आवताडे हे 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांना पहिल्याच निवडणुकीत 40 हजार मते मिळाली होती, तर 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना 55 हजार इतकी मते मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. या मतदारसंघामध्ये मंगळवेढा शहर व तालुका समाविष्ट असून पंढरपूर शहर व लगतच्या 22 गावांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्‍यात भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचा विविध सहकारी संस्था आणि पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून त्यांचा प्रबळ गट आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यात संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचाही गट आहे. पण, हे दोन्ही गट स्वतंत्र लढल्यामुळे 2019 मध्ये आवताडे आणि परिचारक या दोघांचाही पराभव झाला होता. परंतु भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोघांमध्ये मनोमिलन घडवत एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समाधान आवताडे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ठरले आहेत. आवताडे यांना मानणारा वर्ग मंगळवेढा तालुक्‍यात असून आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद लावल्यास आवताडे यांना विधानसभेचा मार्ग सुकर होणार आहे. 

आवताडे-परिचारक एकत्र आले असले तरी आजमितीस मंगळवेढा खरेदी विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष तथा समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज समाधान आवताडे यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा होऊ शकतो, त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत त्यांच्यात तडजोड होऊन सिद्धेश्वर आवताडे यांची मनधरणी करण्यास भाजप नेत्यांना यश येते का? हे पाहावे लागणार आहे. 

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला दिलेली वचने पाळली नाहीत. सध्या हाती आलेले पिके वीज तोडल्याने वाया गेली आहेत. कर्जमाफीची लाभ अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही, त्यामुळे हा या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने भाजप नेत्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीची लढत प्रतिष्ठेची केली आहे. परंतु त्यांना कितपत यश मिळते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख