...हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार : राजन पाटलांनी घेतला मोदी सरकारचा समाचार  - Rajan Patil criticizes Modi government over rising prices of chemical fertilizers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

...हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार : राजन पाटलांनी घेतला मोदी सरकारचा समाचार 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 मे 2021

यामुळे सामान्य जनता व शेतकऱ्यां‍चे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.

अनगर (जि. सोलापूर) : केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची मदत देऊन रासायनिक खतांच्या किंमती (Prices of chemical fertilizers) पंच्चावन्न ते साठ टक्यांनी वाढवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. पाच जीवनावश्यक वस्तूंचेही भाव याच सरकारच्या काळात गगनाला भिडल्याने शेतकरी व सर्वसामान्यांना केंद्र सरकारने आवळा देऊन कोहळा काढण्याचाच लाजीरवाणा प्रकार केला आहे. केंद्र सरकारने महागाई रोखण्यात आपण अपयशी ठरल्याचेच दाखवून दिले आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार राजन पाटील (Former MLA Rajan Patil) यांनी केंद्र सरकारवर  केली. (Rajan Patil criticizes Modi government over rising prices of chemical fertilizers)

सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच रासायनिक खतांच्या किमती केंद्र सरकारने ५० ते ६० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार राजन पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

ते म्हणाले की, रासायनिक खतांचे अनुदान केंद्र सरकारने कमी केल्यामुळे खतांच्या किंमतीमध्ये 55 ते 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका बाजूने सरकार शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची मदत करत आहे आणि दुसऱ्या बाजूने बाराशे रुपये किंमतीची खताची पिशवी 1900 रुपयांस करून केंद्र सरकार शेतकऱ्यां‍वर मोठा अन्याय करत आहे. 

हेही वाचा : महाविकास आघाडीत धूसफूस : शिवसेना आमदाराची शरद पवारांवर टीका

जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीच्या धोरणावर अवलंबून असतात. वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. आज जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या असून काँग्रेस सरकारच्या काळात या स्थिर होत्या. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोना महामारीमुळे लोकांच्या हाताला काम नाही. त्यांच्याजवळ पैसा नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि त्यात महागाई यामुळे सामान्य जनता व शेतकऱ्यां‍चे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, असे राजन पाटील यांनी नमूद केले. 

साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये येत नसतानाही सरकारने केवळ उद्योगपतीसाठी साखरेवर निर्बंध घातले आहेत. परिणामी साखर उद्योग अडचणीत आला आहे. सरकारने उसाला भाव देणे अवघड करुन टाकले आहे आणि आता खतांच्या किंमती वाढविल्यामुळे राहिला-साहिला शेतकरी मोडून पडणार आहे. या महागाईच्या विरोधात शेतकऱ्यां‍ना घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा माजी आमदार राजन पाटील यांनी या वेळी बोलताना दिला.

या प्रसंगी कृषी भूषण दादा बोडके, मुरलीधर गुंड, बाबा मुलाणी, भगिरथ गुंड, नारायण गुंड, धनाजी गुंड आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख