मोहिते पाटलांची हुजरेगिरी करूनच संजय शिंदे आमदारकीपर्यंत पोचले

त्याच संजय शिंदेंनी खासदारकीला तोंडावर आपटल्यावर आमदारकीला राष्ट्रवादीचं तिकीट का घेतलं नाही.
Narayan Patil replied to the allegation of MLA Sanjay Shinde
Narayan Patil replied to the allegation of MLA Sanjay Shinde

सोलापूर : ‘‘पंढरपूर (Pandharpur) मतदारसंघाची जबाबदार माझ्यावर आहे, अशी स्वयंघोषणा केली तरीही तेथे पराभवाला सामोरे जावे लागले. पंढरपूरचा पराभव आणि उजनीचे (Ujani) पाणी इंदापूरला (Indapur) जाणे थांबणे (संजय शिंदे यांचा इंदापूरला पाणी देण्यास पाठिंबा होता, असा दावा नारायण पाटील यांनी केलेला आहे), हे दोन धक्के आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. त्यातून सावरण्यास त्यांना आता बराच वेळ लागेल. आमदार शिंदे हे मोहिते-पाटलांची (Mohite-Patil) हुजरेगिरी करूनच इथपर्यंत पोचले आहेत, हे स्वतः ते विसरले असले तरी सोलापूर (Solapur) जिल्हा विसरलेला नाही, याचे भान ठेवून शिंदे यांनी माझ्या शिवसेना निष्ठेविषयी बोलावे,’’ असा पलटवार करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Former MLA Narayan Patil) यांनी शिंदे यांच्यावर केला आहे. (Narayan Patil replied to the allegation of MLA Sanjay Shinde)

मुंबईत गेल्यानंतर शिवसेनेचे, तर सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे मराठवाड्यास पाणी देताना गप्प का बसले होते, असा सवाल आमदार संजय शिंदे यांनी विचारला होता. त्याला पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाचा आदर करणे, यात काय चुकीचे आहे, हेच समजत नाही. आज सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नेतेमंडळी ही मोहिते-पाटील यांच्याच नेतृत्वाखाली काम करत राजकीयदृष्ट्या स्थिरावली आहेत. यात एकेकाळी शिंदे घराणेसुद्धा मोहिते-पाटील यांचेच नेतृत्व मानत होते. याचा विसर आमदार संजय शिंदे यांना पडला असावा. वास्तविक संघर्षातून व जनतेची कामे करून मी आमदारपदापर्यंत पोचलो आहे, हे जिल्ह्यातील सर्वांना ठाऊक आहे.

संजय शिंदे यांना 2014 मध्ये पराभूत करुनच मी विधानसभेची निवडणूक जिंकली होती. हा इतिहास संजय शिंदे यांनी विसरू नये. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आमदार संजय शिंदे यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मला जनतेने दिला आहे. करमाळा मतदार संघातील विकासकामांबाबत मी विचारणा करतच राहणार आहे. मी जशी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, तशीच संजय शिंदे यांनीसुद्धा अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली होती. यामुळे अगोदर आपण कोणत्या पक्षाचे आहोत, हे आतातरी संजय शिंदे यांनी जनतेसमोर मांडावे, असे आव्हान माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजय शिंदे यांना दिले. 

निष्ठा आणि शिंदे यांचा काडीचाही संबंध राहिलेला नाही. जे संजय शिंदे पवार आपल्या ह्‌द्‌यात आहेत, असं सांगतात. त्याच संजय शिंदेंनी खासदारकीला तोंडावर आपटल्यावर आमदारकीला राष्ट्रवादीचं तिकीट का घेतलं नाही. आमदारकीच्या तिकिटासाठी दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी सोडून भाजपच्या नेत्यांकडे मदतीचा चेक देण्याच्या बहाण्याने किती चकरा मारत होते, हे सगळ्या जिल्ह्याने बघितले आहे. शिवसेनेच्या तिकिटासाठी आपले बंधू व आपण स्वतः शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या पुण्याच्या बंगल्याच्या गेटवर थांबलेले हेही लोकांनी पाहिले आहे.

कधी अपक्ष, कधी शेतकरी संघटना, कधी भाजप, कधी समविचारी आघाडी, कधी शिवसेना आणि आधीमधी राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या संजय शिंदेंनी माझ्या निष्ठेवर बोलणे म्हणजे ‘सौ चूहे खाके बिल्ली हज को चली,’ असा प्रकार आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर प्रथम भाजपला पाठिंबा देणारे संजय शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार येणार असे दिसताच राष्ट्रवादीच्या तंबूत शिरले, त्यामुळे संजय शिंदे यांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत, असा शब्दांत नारायण पाटील यांनी सुनावले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com