आम्हाला माहिती देऊ नका, असं कोणी सांगितलंय का? : साडेपाच वर्षांनंतर पालिकेत आलेले परिचारक चिडले

या दुकलीने नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा मंगळवेढयात सुरू झाली आहे.
MLA Paricharak and Avtade held a review meeting in Mangalwedha Municipality
MLA Paricharak and Avtade held a review meeting in Mangalwedha Municipality

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हिसकावून घेण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक हे तब्बल साडेपाच वर्षांनंतर प्रथमच मंगळवेढा नगरपालिकेत आले होते. बैठकीला नगराध्यक्ष, पक्षनेते, बहुतांश नगरसेवकांसह मुख्याधिकारीदेखील गैरहजर होते. त्यामुळे चिडलेल्या परिचारकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले. ‘आम्हाला माहिती द्यायची नाही की कोणी देऊ नको म्हणून सांगितले आहे का?’ असा उद्‌विग्न सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. (MLA Paricharak and Avtade held a review meeting in Mangalwedha Municipality)

पंढरपूर विधानसभेची जागा आमदार प्रशांत परिचारकांशी समझोता करत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी जिंकली. आमदार झाल्यानंतर आवताडे यांनी आमदार परिचारक यांच्या सोबतीने प्रथम नगरपालिकेत पाऊल टाकत आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या निमित्ताने परिचारक आणि आवताडे या दुकलीने नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा मंगळवेढयात सुरू झाली आहे. 

आमदार प्रशांत परिचारक हे आमदार झाल्यापासून शहराच्या विकासासाठी त्याच्या समर्थकांनी मागणी केलेले बहुतांश प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, ते कधीच नगरपालिकेमध्ये आले नव्हते. यंदा आढावा बैठकीच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांच्या सोबतीने त्यांनी नगरपालिकेमध्ये आढावा बैठकीला उपस्थिती लावली.

मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष, पक्षनेते, बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यांच्यासह मुख्याधिकारी यांनीही आजारपणामुळे बैठकीकडे पाठ फिरवली होती. बैठकीला कॉंग्रेसचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले मात्र उपस्थित होते 

आढावा बैठकीमध्ये आमदार आवताडे यांच्यापेक्षा आमदार प्रशांत परिचारक हे अधिक आक्रमक झाले होते. नगरपालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा घेताना विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी कर्मचाऱ्यावर केली. त्याबाबत खडे बोल सुनावत, ‘माहिती द्यायची नाही की कोण देऊ नको म्हटले का? माहितीच उपलब्ध नसेल, तर आमचे आम्ही माहिती उपलब्ध करू,’ अशी तंबी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार परिचारक हे अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. 

नगरपालिका निवडणुकीची तयारी?

आमदार परिचारकांच्या पाठिंब्यामुळे  समाधान आवताडे यांना आमदारपदाची संधी मिळाली, त्याच पद्धतीने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतही परिचारक गटाच्या मदतीने आमदार आवताडे हे नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच, गेली साडेपाच वर्षे नगरपालिकेत न आलेले आमदार परिचारक निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिकेत आल्यामुळे मंगळवेढा शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com