काम जमत नसेल, तर सरकारकडे परत जा : भाजप नगरसेवकाने आयुक्तांना सुनावले

यासंदर्भात प्रशासनाने माहिती देणे जाणीवपूर्वक टाळले आहे.
If you can't work properly, go back to the government : Suresh Patil
If you can't work properly, go back to the government : Suresh Patil

सोलापूर  : कोरोना आपत्ती निवारणासाठी सोलापूर (Solapur) महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची औषधे व साहित्य खरेदी केले. मात्र, यातील काही औषधे ही मुदत संपली होती, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील (Suresh Patil) यांनी आयुक्तांसमोर बैठकीतच केला. यावर प्रशासनाकडून मौन बाळगले जात असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

दरम्यान, याच बैठकीत नगरसेवक सुरेश पाटील व आयुक्त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांच्यामध्ये खडाजंगी झाली. आयुक्त व्यवस्थित माहिती देत नसल्याचे पाहून संतापलेले नगरसेवक पाटील यांनी ‘व्यवस्थित काम करणे जमत नसल्यास सरकारकडे परत जा,’ या शब्दांत आयुक्तांना सुनावले. (If you can't work properly, go back to the government : Suresh Patil)

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत झोननिहाय बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारी (ता. 5 मे) झोन क्रमांक 3 व 4 ची बैठक महापौर श्रीकांचना यन्नम यांनी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. त्या वेळी आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते तसेच संबंधित झोनचे नगरसेवक उपस्थित होते. 

या बैठकीत नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रश्नांचा भडिमार केला. सिंहगडमध्ये सध्या किती कोरोना रुग्ण आहेत, त्या तुलनेत शासकीय निर्देशाप्रमाणे डॉक्‍टर व अन्य मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे का, कोरोना आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने औषधे व अन्य साहित्यांची खरेदी केली. यामधील काही औषधे ही मुदत संपलेली होती का, आरोग्य व सामान्य प्रशासन विभागाच्या भांडाराचे एकत्रीकरण नियमानुसार करता येते का अशा विविध प्रश्नांची सरबत्ती पाटील यांनी केली. 

... अन्यथा बैठकीतून निघून जाईन 

यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलण्यास सांगितले. पण, पाटील यांनी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, असे म्हणत आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विचारलेल्या प्रश्नांची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने पाटील यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे तरुण नगरसेवक नागेश बुगडे यांनीदेखील रोखठोक भूमिका घेतली. या प्रकाराने आयुक्त संतापले आणि त्यांनी या नगरसेवकांना नीट बोलायला सांगा; अन्यथा आपण बैठकीतून निघून जाणार असे महापौरांना सांगितले. यावर पांडे व अन्य जणांनी मध्यस्थी करून आयुक्तांना परावृत्त केले.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना प्रशासन आवश्‍यक त्या उपाय योजना करीत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात नाही, असे पाटील व भोगडे यांचे म्हणणे होते. शहरातील प्रत्येक प्रभागात महापालिकेने आरोग्य केंद्राची सोय करावी, ही त्यांची मागणी आयुक्तांनी मान्य केली.

...म्हणून आयुक्तांनी तिघांना जबाबदारीतून मुक्त केले

बैठकीनंतर सुरेश पाटील यांनी सांगितले की, कोरोना आपत्ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने खरेदी केलेल्या औषध व अन्य साहित्यांचा तपशील मी मागितला होता. याविषयीची माहिती मला देत असल्याच्या संशयावरून आयुक्तांनी उपायुक्त धनराज पांडे, आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते व भांडारपाल वेदपाठक यांना संबंधित जबाबदारीतून मुक्त केले, असा आरोप सुरेश पाटील यांनी केला.

दोषींवर कारवाई करा 

महापालिकेने मुदत संपलेल्या औषधांची खरेदी केली, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. यासंदर्भात प्रशासनाने माहिती देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com