राष्ट्रवादीला धक्का  ः भालकेंचे कट्टर समर्थक, ‘विठ्ठल’चे संचालक बागलांचा स्वाभिमानीला पाठिंबा  - Director of Vitthal Sugar Factory Suresh Bagal supports Swabhimani Shetkari Sanghatana candidate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राष्ट्रवादीला धक्का  ः भालकेंचे कट्टर समर्थक, ‘विठ्ठल’चे संचालक बागलांचा स्वाभिमानीला पाठिंबा 

भारत नागणे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नेत्यांच्या जाहीर सभानंतर आता फोडाफो़डीच्या राजकारणाला ऊत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने पोट निवडणुक प्रतिष्ठेची केली असतानाच स्वाभिमानी शेतकरीचे माजी खासदार राजू शेट्टींनीदेखील या मतदारसंघात आपली ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शह काटशहाचे राजकारण सुरु असतानाच आता स्वाभिमानीने ही यामध्ये उडी घेत पंढरपुरात राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. 

(कै.) आमदार भारत भालके यांचे कट्टर समर्थक व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सुरेश बागल यांच्या गादेगाव, वाखरी, कोर्टी, कौठाळी येथील अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत प्रचार सुरू केला आहे. यामुळे भालके गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

बागल हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गेल्या 25 वर्षांपासून संचालक आहेत. (कै.) वसंतराव काळे यांच्या निधनानंतर भारत भालके यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष करण्यात सुरेश बागल यांचा मोठा वाटा होता. स्वत: बागल व त्याचे कार्यकर्ते हे 2019 पर्यंत आमदार भारत भालके यांच्यासोबत होते. पोटनिवडणुकीदरम्यान बागल व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समर्थन दिले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. शेतीपंपाची सुरू असलेली सक्तीची वीजबिलवसुली, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांना न मिळालेली नुकसान भरपाई, अर्धवट राहिलेली कर्जमाफी यावरून स्वाभिमानीने सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. पोटनिवडणुकीत तर स्वाभिमानीने थेट महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार देत महाविकास आघाडीच्या विरोधात बंड पुकारले आहे.

पोट निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. दोघांनी ही मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यांच्या सभांना मतदार शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे. येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना गाठीभेटी आणि गुप्त बैठकांना वेग आला आहे.

स्वाभिमानीने या निवडणुकीत जोरदार ताकद लावली आहे. मतदारसंघात शेतकरी संघटनेचे जाळे मोठे आहे. याचा फायदा संघटनेला होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपवर नाराज असलेले अनेक नेते स्वाभिमानीच्या संपर्कात आहेत. त्यापैकी गादेगाव येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल यांनी स्वाभिमानीला पाठिंबा दिला आहे. विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक धनंजय पाटील आणि रायाप्पा हळणवर यांनी यापूर्वीच स्वाभिमानीला पाठिंबा दिला आहे. बागल यांच्या  पाठिंब्यामुळे स्वाभिमानीचे बळ वाढले आहेत, तर राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख