बागल गटाची धुरा दिग्विजयच्या खांद्यावर ! - Digvijay Bagal will lead the Bagal group in Karmala | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

बागल गटाची धुरा दिग्विजयच्या खांद्यावर !

अण्णा काळे
गुरुवार, 1 जुलै 2021

आजच्या घडीला बागल गट अडचणीत आहे. 

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळ्याची आमदारकी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आदिनाथ आणि मकाई साखर कारखाना ही सर्व सत्तास्थाने एकेकाळी एकहाती पादाक्रांत करणारा बागल गट सध्याच्या घडीला बॅकफूटवर गेला आहे. मात्र याही परिस्थितीत मनोधैर्य खचू न देता बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी बागल गटाचे धुरा हाती घेत गावोगावी दौरे सुरू केले आहेत. बागल गटापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना आपलेसे करत नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. (Digvijay Bagal will lead the Bagal group in Karmala)

करमाळा तालुक्याचे राजकारण हे गेली 25 वर्ष बागल गटाभोवती फिरताना दिसते आहे. तालुक्यातील राजकीय ताकद या गटाने कायमच दाखवून दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असताना विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेच्या उमेदवारीवर विधानसभा लढवली. मात्र, त्या निवडणुकीत रश्मी बागल ह्या तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या.

विधानसभेच्या 2014 व 2019 च्या निवडणुकीत झालेला पराभव, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची एकहात्ती सत्ता असतानाही झालेली दैनावस्था, त्यातून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकरण, मकाई सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी या सर्व बाबींचा विचार करता आजच्या घडीला बागल गट अडचणीत आहे. 

हेही वाचा : गोपीचंद पडळकर समर्थकांचे २४ तासांत उत्तर

राजकीयसह सर्व परिस्थिती विरोधात असूनही बागल गटाने अद्याप खचून न जात पुन्हा लढण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यातूनच बागल गटाचे युवा नेते, मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे निष्ठावंत बागल गटात चैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे. 

दिग्विजय बागल हे गेली काही महिन्यांपासून करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत. वाड्यावस्त्यांवर जाऊन ते लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी थेट मंत्रालयात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन कुकडीचे पाणी सीना नदीवरील बंधाऱ्यात सोडण्यासंदर्भात केलेल्या मागणीचे लोकांनी कौतुक केले होते.

एकेकाळी करमाळा तालुक्यातील सर्व सत्तास्थाने बागल गटाच्या हाती होती. या काळात बागल गटांतील कार्यकर्त्यांची गर्दी, त्यांच्यातील उत्साह आज कुठेच दिसत नसल्याने तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ होते. नेमके त्याचवेळी दिग्विजय बागल यांनी भेटीगाठी सुरू केल्याने दिग्विजय यांच्या रूपाने एक नवी आशा कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. माजी राज्यमंत्री (स्व.) दिगंबरराव बागल यांना मानणारा वर्गही यामुळे सुखावला आहे. 
 
रश्मी बागलांकडून नेतृत्वासाठी वाव

लोकांच्या भेटीगाठी, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न, वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा वाढवलेला संपर्क,  ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न आणि दिग्विजय बागल करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियातून होणारी प्रसिद्धी, या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी काळात दिग्विजय बागल हेच बागल गटाचे भविष्यकाळात नेतृत्व करतील असे दिसू लागले आहे. अलीकडच्या काळात रश्मी बागल ह्यादेखील दिग्विजय बागल यांनाच नेतृत्व करण्यासाठी वाव देत असल्याचे जाणवत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख