उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील कृषिभूषण दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या द्राक्षाच्या किंगबेरी या नव्या वाणाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आल्यानंतर भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पवार यांना नमस्कार केला. त्याचवेळी पवार यांनी हसतमुखाने सुभाष देशमुख यांच्याशी हस्तांदोलन केले. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांशी हितगुज साधत असल्याचे या वेळी दिसून आले.
द्राक्षाच्या किंगबेरी या नव्या वाणाचे लोकार्पण झाल्यानंतर पवार यांनी आपल्या हातातील द्राक्षाच्या घडातील एक मणी तोडून तो कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भरवला. त्याचवेळी शिंदे यांनीही पवारांना द्राक्षाचा मणी भरवला. त्यामुळे उपस्थितांमध्ये टाळ्याचा कडकडाट झाला.
या वेळी पवार म्हणाले, "नान्नजमध्ये आल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नान्नजकरांनी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत. कमी पाण्याची पिके घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भविष्यात शेतकऱ्यांनी शेतीत नवे विज्ञान, तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे. शेती सुधारण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. शेतकऱ्यांच्या प्रयोगातूनच नवनवीन वाणांचा जन्म झाला आहे.''
(कै.) नानासाहेब काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र दत्तात्रेय काळे यांनी शेतीत आधुनिकता आणली आहे. शेतीत बदल, नावीन्य, दर्जा, जमिनीचा पोत सुधारणे, कमी पाण्यात शेती करणे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे आणि नान्नज हे त्याचे केंद्र झाले आहे. नव्या पिढीच्या शेतकऱ्यांनी यातून शिकण्याचे आवाहनही पवार यांनी केले.
या वेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवारांनी मला शेतीचे वेड लावले आहे. आज माझ्याकडेही द्राक्षाची बाग आहे. पण, सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनराव शिंदे, यशवंत माने, सुभाष देशमुख, रवींद्र बाबर, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, प्रदीप गारटकर, उमेश परिचारक, कृषीभूषण दत्तात्रेय काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद उपस्थित होते.

