भाजपच्या एका आमदारासह सुभाष देशमुखांच्या मुलाविरोधात दोषारोपपत्र दाखल - Chargesheet filed against Subhash Deshmukh's son along with a BJP MLA | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या एका आमदारासह सुभाष देशमुखांच्या मुलाविरोधात दोषारोपपत्र दाखल

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानापैकी पन्नास टक्के म्हणजे पाच कोटी रुपये संस्थेच्या बॅंक खात्यात जमा झाले होते. 

सोलापूर : बनावट कागदपत्रे सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान उचलल्याप्रकरणी लोकमंगल मल्टिस्टेटच्या तत्कालीन नऊ संचालकांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य सात जणांचा यात समावेश आहे. रामराजे राजसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागांवकर, प्रकाश वैजिनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राम नरसगोडे अशी त्या अन्य संचालकांची नावे आहेत. 

तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी 28 नोव्हेंबर 2018 रोजी यासंबंधीची फिर्याद दिली होती. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांच्यामार्फत 2015 मध्ये राज्य सरकारकडे दूध भुकटीनिर्मिती आणि विस्तारित दुग्ध शाळेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी लागणारी कागदपत्रे बनावट सादर केली होती. यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळू नये, अशी तक्रार दुग्ध विकास पशुसंवर्धन कार्यालयाकडे आली होती.

त्यानुसार चौकशीदरम्यान काही कागदपत्रे बनावट आढळली. त्याच दरम्यान सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानापैकी पन्नास टक्के म्हणजे पाच कोटी रुपये संस्थेच्या बॅंक खात्यात जमा झाले होते. 

आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. आता त्यासंबंधीचे दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख