बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना कोरोनाची लागण - Barshi MLA Rajendra Raut infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना कोरोनाची लागण

प्रशांत काळे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

माझी प्रकृती व्यवस्थित आहे. 

बार्शी  (जि. सोलापूर) :  बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांना शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती आमदार राऊत यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

‘‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही कारण नाही,’’ असे राऊत यांनी आपल्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असताना अनेक जण, कार्यकर्ते, सामाजिक अंतराचे पालन करीत नाहीत. बार्शी शहर व तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार राऊत अनेक बैठकांसाठी जात होते. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असे त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खराडे यांनी स्पष्ट केले. बार्शी शहर आणि तालुक्यातील माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करुन घ्यावी, सर्वांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे. माझी प्रकृती व्यवस्थित असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे, असे आमदार राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा : अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आमदार राजेंद्र राऊतांनी  लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

बार्शी    ः  बार्शी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून प्रशासन हतबल झाले आहे. अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत नसून अधिकाऱ्यांना पैसे मिळत असतील, तरच ते या मोहिमेत भाग घेतात. त्यांना मतांची गरज नाही. लोकप्रतिनिधींना पैसे नाही, तर मतांची गरज आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपवावी, अशा मागणीचे पत्र बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. 

आमदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये स्वतःची भूमिका मांडली आहे. आपण कोणताही व्यापार, उद्योग बंद करू नये. येणाऱ्या उत्पन्नातून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर देऊ नये. प्रत्येक मतदारसंघातील आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांची समिती नेमण्यात यावी. 

जोपर्यंत आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य  नगरसेवक, सरपंच, इतर लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाहीत आणि आपण या लोकप्रतिनिधींवर जबाबदारी देत नाहीत, तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढाईत व्यवस्थितपणा येणार नाही, असेही पत्रात राऊत यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे लसीकरण, चाचणी, रुग्णालये, डॉक्टर, कर्मचारी यांची उपलब्धता करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सक्रीय सहभाग यात आवश्यक आहे. जो लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नेमण्यात येत नाही, तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई जिंकणे तसे अवघड आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख