वसंतराव कोरेकरांच्या निष्ठेला अशोक पवारांकडून मिळाले मानाचे पान - Ashok Pawar gave justice to Vasantrao Korekar's loyalty by giving him the post of sabhapati) | Politics Marathi News - Sarkarnama

वसंतराव कोरेकरांच्या निष्ठेला अशोक पवारांकडून मिळाले मानाचे पान

नितीन बारवकर  
शनिवार, 10 जुलै 2021

विरोधकांनीही मोठ्या मनाने माघार घेतल्याने ॲड. वसंतराव कोरेकर शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

शिरूर : एकाला दिले; तर दुसरा नाराज आणि दुसऱ्याचा विचार केला; तर इतरांची खप्पामर्जी...अनेकांच्या महत्वाकांक्षेमुळे नेतेमंडळींची वाढलेली डोकेदुखी...समवयीन संचालकांमध्ये पदप्राप्तीसाठी ताणलेली स्पर्धा...प्रांतिक वादातून वाढलेली अहमहमिका अन्‌ त्यातून बंडाचा झेंडा फडकण्याची भीती...या पार्श्‍वभूमीवर शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदासाठी वयाने सर्वांत ज्येष्ठ, अनुभवाबरोबरच; मनाने मोठे आणि संयमी, मितभाषी व महत्वाचे म्हणजे ‘राजकारणातील अजातशत्रू’ म्हणून लौकिक असलेल्या ॲड. वसंतराव कोरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अन्‌ शमलेल्या बंडाळीबरोबरच; विभागीय अस्मितेच्या तलवारी म्यान झाल्या. कोरेकर यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखीत विरोधकांनीही मोठ्या मनाने माघार घेतल्याने त्यांची शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. (Ashok Pawar gave justice to Vasantrao Korekar's loyalty by giving him the post of sabhapati)

शिरूर तालुक्‍यातील न्हावरे या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या व मोठ्या गावाला प्रतिनिधित्व देण्यातून कोरेकर यांच्या गळ्यात बाजार समितीच्या सभापतिपदाची माळ पडली असली; तरी त्यात राजकीय हिशेबांपेक्षा कोरेकर यांची ज्येष्ठता तुलनात्मकदृष्ट्या भारी ठरली. या ज्येष्ठतेला पक्षीय एकनिष्ठेची जोड मिळाली आणि पक्षाच्या पायाभरणीत मोलाचे स्थान असलेल्या कोरेकर यांना आपसूकच मानाचे पान मिळाले. 

हेही वाचा : आमदार अशोक पवारांनी बाजी मारत सभापतिपद नेले ‘शिरूर-हवेली’त

शशिकांत दसगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर गतवर्षी नवीन सभापती निवडीवेळीही त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. तथापि, दसगुडे हे शिरूर भागातील असल्याने व त्यांच्यानंतर सभापतिपदाची जबाबदारी आंबेगावला जोडलेल्या ३९ गावांतून देण्याचा विषय पुढे आल्यानंतर शंकर जांभळकर यांना संधी मिळाली. त्यावेळी अनुभव, ज्येष्ठता व सभापतिपदाच्या सर्व निकषांमध्ये बसत असूनही केवळ विभागीय समतोल राखण्यासाठी त्यांना थांबावे लागले. 

सत्ताचक्रानूसार यंदा पुन्हा हे पद शिरूरला मिळणार असल्याचे स्पष्ट होताच कोरेकर यांचे नाव प्राधान्याने पुढे आले. त्यांच्यासह आबाराजे मांढरे व विश्‍वास ढमढेरे यांच्या नावाची चर्चा होती. ढमढेरे यांना यापूर्वी उपसभापतिपद देण्यात आल्याने त्यांचे नाव मागे पडले.

तथापि, तालुक्‍याच्या राजकारणातील महत्वाकांक्षी युवा नेते म्हणून आबाराजे यांचे नाव कोरेकर यांच्यापेक्षाही कांकणभर पुढे होते. पण, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य असून, ते स्वतः यापूर्वी शिक्रापूरचे उपसरपंच होते. त्यामुळे आबांऐवजी काकांना संधी मिळाली. राजकीय मेळ साधण्यातूनही कोरेकर यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार केला गेला आणि सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून त्यांच्या पारड्यात पसंतीची मापे अधिक पडली. 

‘काका नसते तर धोका’ 

विभागीय अस्मितेतून सभापतिपद आंबेगावला जोडलेल्या ३९ गावांतून देण्याच्या मुद्‌द्‌याने उचल खाताच शिरूरमधील तिघेही इच्छुक खडबडून जागे झाले. या तिघांच्या तीव्र स्पर्धेतून निर्णय होईनासा झाल्यावर पर्याय म्हणून पुन्हा जांभळकर यांचे नाव पुढे आले. हीच संधी साधून भाजपनेही सभापती निवडीच्या रणांगणात उडी घेतली. भाजपचे दोन्ही संचालक हे शिरूर भागातील असल्याने त्यांच्या मताला चांगलीच किंमत आली.

जांभळकर यांच्याविरोधात उभ्या ठाकणाऱ्या शिरूर भागातील सहा नाराजांना भाजपच्या दोघांमुळे दहा हत्तीचे बळ मिळणार होते. या घडामोडींची कुणकूण लागताच कोरेकर यांचा पर्याय काढला गेला. त्यामुळे भाजपच्या दोघांनाही माघार घेण्यावाचून पर्याय उरला नाही.

कोरेकर यांना ‘काका’ नावाने संबोधले जाते. त्यामुळे आज ‘काका झाले नसते, तर धोका झाला असता’ अशी दबक्‍या आवाजातील चर्चा सभापती निवडीनंतर उमटली. त्यातच आबाराजे मांढरे व विश्‍वास ढमढेरे या इच्छुकांच्या अनुक्रमे शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे या मोठ्या गावांतही नाराजीची लकेर उमटली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख