मंगळवेढा : महाविकास विकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला. त्या रिक्त जागी भूम-परंड्याचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून होऊ लागली आहे.
मागील शिवसेना-भाजप सरकारच्या काळात त्यांच्याकडे जलसंधारण खात्याचा पदभार देण्यात आला होता. परंतु त्यांना कामकाज करण्यात कमी कालावधी मिळाला होता, त्यामुळे त्यांना अधिक काम करता आले नाही. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भूम परंडा मतदारसंघामधून ते आमदार झाले.
राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केले. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला कमी मंत्रिपदे आली. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्यासारख्या बड्या आमदारास मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले.
सावंत यांना मानणारा वर्ग सोलापूर जिल्हाबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या धडाकेबाज कामामुळे पक्षाने त्यांना यवतमाळमधून विधान परिषद पाठविले होते. त्यामुळे त्यांना संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागी मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांमधून होऊ लागली आहे.
आमदार डॉ. तानाजी सावंत हे उस्मानाबादचे आमदार असले तरी त्यांचे सोलापूर जिल्ह्याच्या विकासात योगदान मिळू शकते. म्हणून या दोन जिल्ह्यांचा विचार करून त्यांना मंत्रीपद दिल्यास शिवसेना वाढीबरोबरच विकासाला गती येईल. पक्षप्रमुखांनी त्यांचा विचार करावा.
-शैला गोडसे, महिला आघाडीप्रमुख, सोलापूर जिल्हा

