Ranjit Shingh Mohite Patil and Sanjay Shinde came together in a wedding ceremony
Ranjit Shingh Mohite Patil and Sanjay Shinde came together in a wedding ceremony

चर्चा तर होणारच : कट्टर विरोधक रणजितदादा अन्‌ संजयमामा आले एकत्र ! 

राष्ट्रवादीत असतानाही शिंदे आणि मोहिते पाटील घराण्यात गेल्या काही वर्षांपासून तेवढेसे सख्य नव्हते.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील दुसऱ्या पिढीतील कट्टर प्रतिस्पर्धी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. मोहिते पाटील आणि शिंदे घराण्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकमेकांसमोर आलेले हे दोन्ही नेते एका विवाह समारंभात मात्र एकाच कोचवर बसून हितगुज करताना पाहून अनेकजण अचंबित झाले. सोशल मीडियातून या दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा आहे. 

मोहिते पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्यावरील वर्चस्वाला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून आमदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नाने सुरूंग लावण्यात आला. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील "दादा' नेतृत्वाचा उघड आशीर्वाद होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असतानाही शिंदे आणि मोहिते पाटील घराण्यात गेल्या काही वर्षांपासून तेवढेसे सख्य नव्हते. वर्चस्व आणि नेतृत्वाची स्पर्धा त्यामागे होती. 

राष्ट्रवादीत असताना मोहिते पाटील बोले आणि सोलापूर जिल्हा डोले अशी परिस्थिती असताना संजय शिंदे यांनी तत्कालीन पालकमंत्री आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने त्याला सुरूंग लावला. त्यावेळी शिंदे यांना बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढ्याचे समाधान अवताडे, मोहोळचे विजयराज डोंगरे यांची साथ होती. समविचारी आघाडी नावाने हा गट ओळखला जात होता. देशमुख यांनी तत्कालीन सत्तेची ताकद या मंडळींच्या पाठीशी उभी केली होती. या ताकदीच्या जोरावरच त्यांनी प्रथम राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली स्थानिक स्वराज्य संस्थाची आमदारकी प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून मिळविली. त्यानंतर संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद मिळविले. 

शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यातील खरा टोकाचा संघर्ष रंगला तो लोकसभा निवडणुकीत. माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नावे पुढे करण्यात आले. त्यामागे अर्थातच मोहिते पाटील विरोध असल्याचे आजही ठामपणे सांगितले जाते. पक्षात डावलेले जात असल्याचे पाहून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याचे सांगून भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरला. 

याचदरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविलेले संजय शिंदे यांना बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. मोहिते पाटील यांनी सेफ गेम खेळताना फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालत त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली. या निवडणुकीत दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप झाले. माळशिरस मतदारसंघातून एक लाखाचे लीड देण्याचा शब्द तेव्हा रणजितदादांनी जाहीरपणे दिला होता. त्याला संजय शिंदे प्रत्युत्तर देताना विजयदादांच्या मताधिक्‍क्‍याचा दाखला द्यायचे. "माळशिरसमधून खुद्द विजयदादा उमेदवार असताना कधी एक लाखाचे लीड मिळाले नाही' असा युक्तीवाद ते करायचे. पण, रणजितदादांनी आपला शब्द खरा करत सुमारे लाखापेक्षा जास्त मताचे लीड माळशिरसमधून निंबाळकर यांना दिले होते. 

हा सर्व संषर्घ पाहता माढा तालुक्‍यातील अरण येथे हरिदास रणदिवे यांच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने रणजिदादा आणि संजयमामा एकत्र येणे हा चर्चेचा विषय होता. त्यानुसार सोशल मीडियावर त्याची चर्चा होत असतानाच राजकीय वर्तुळात कुतुहलाचा विषय झाला आहे. 

आणखी एक कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर 

याच लग्न समारंभात जिल्हा परिषदेच्या मोडनिंब गटाचे सदस्य भारत शिंदे व त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी कांबळे हे देखील एकत्र आले होते. मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले भारत शिंदे आज आमदार बबनदादा शिंदे यांच्यासोबत आहेत. एकेकाळी आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी सभापती शिवाजी कांबळे हे सध्या मोहिते पाटील यांच्यासोबत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com