पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादी-भाजपबरोबरच आवताडेंची भूमिका निर्णायक  - In Pandharpur-Mangalvedha, the role of Samadhan Avtade along with NCP-BJP is decisive | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादी-भाजपबरोबरच आवताडेंची भूमिका निर्णायक 

हुकूम मुलाणी 
रविवार, 31 जानेवारी 2021

अलिकडच्या पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीकेंद्रीत राजकारणाला अधिक प्राधान्य दिल्याचे 2009 पासून दिसून आले.

मंगळवेढा : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरबरोबर मंगळवेढ्यातील भारतीय जनता पक्ष सक्रीय झाला आहे. संघटनात्मक बदल करून भाजपने नव्याने संधी दिली आहे. त्याही आमदार प्रशांत परिचारक समर्थकांना अधिक संधी दिली असली तरी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची भूमिका सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली. 

पोटनिवडणुकीत पंढरपुरातील मतदारांबरोबर मंगळवेढ्यातील मतदारांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे. मंगळवेढ्यातील मतदार हा स्वतंत्र विचारसरणीचा असल्यामुळे अलिकडच्या पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीकेंद्रीत राजकारणाला अधिक प्राधान्य दिल्याचे 2009 पासून दिसून आले.

आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून चाचपणी सुरू आहे, तर भाजप व इतर मित्र पक्षाची भूमिका काय असणार, याकडे देखील राजकीय निरीक्षकांचे डोळे लागले आहेत. 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार प्रशांत परिचारक यांच्याबरोबरीने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या हालचाली या पुढील काळात काय असणार, हे देखील पाहावे लागणार आहे. परंतु आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर दौऱ्यात त्यांनी भाजपचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर भाजपचे नेते सतर्क झाले आहेत. 

त्यातूनच नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारिणीत आमदार परिचारक यांचे समर्थक असलेले दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर यांना जिल्हा संघटनेवर संधी दिली. मंगळवेढा शहराध्यक्ष म्हणून गोपाळ भगरे यांना, तर तालुकाध्यक्ष म्हणून गौरीशंकर बुरकुल यांना संधी दिली आहे, त्यामुळे हे बदल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणीसाठीचे पाऊल असल्याचे संकेत मिळत आहेत. 

सध्या पुण्यातील एका संस्थेच्या वतीने या मतदारसंघात सर्वेक्षण सुरू आहे, त्या सर्वेक्षणामागे कोण आहे? याची देखील चर्चा सुरू असतानाच सध्या राष्ट्रवादीबरोबरच भाजपच्या हालाचाली वाढल्या आहेत. परंतु दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना मानणारा वर्ग मंगळवेढ्यात मोठा आहे. शिवाय तालुक्‍यातील विविध सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचे प्राबल्य आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी पंढरपूर तालुक्‍यातदेखील प्रवेश करून काही सदस्य विजयी करण्यात बाजी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपबरोबर आवताडेंची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख