आमदार संजय शिंदेंपाठोपाठ मोहिते पाटीलही पंढरपुरात ठाण मांडणार

मात्र, 2014 च्या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
Mohite Patil will hold a campaign rally for BJP candidate Samadhan Avtade
Mohite Patil will hold a campaign rally for BJP candidate Samadhan Avtade

मंगळवेढा  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक आणि मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना एकत्र आणले. आता परिचारक यांच्याबरोबरच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेल्या मोहिते पाटील गटाने आपली ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबरच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हेदेखील या मतदारसंघात ठाण मांडणार आहेत.

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या शब्दाला मान असून या गटाची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आवताडे यांच्यासाठी महत्वाचा आहे.

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने तयारीला पुरेसा वेळ न मिळाल्याने विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांनी निर्णायक भूमिका बजावली होती. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांनी अर्ज भरल्यानंतर मोहिते पाटील यांचे जिल्ह्यातील कट्टर विरोधक आमदार संजय शिंदे यांनी ‘भारत भालके यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून आपण भगिरथ यांना मदत करण्यासाठी या मतदारसंघात प्रचार सभेसाठी येणार आहे,’ असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अकलूजला जाऊन शिवरत्न बंगल्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंगळवेढ्यातील मोहिते-पाटील समर्थक उपस्थित होते. त्यांना समाधान आवताडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना खुद्द विजयदादांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

मंगळवेढा येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की स्वतः विजयदादा या मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत. मी स्वतः देखील या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही जागा विजयी करण्यासाठी वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार दोन मोठे नेते एकत्र आले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनीसुद्धा एक-दोन पाऊल मागे पुढे होऊन अवताडे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला.  

मोहिते पाटलांना मानणारा वर्ग या मतदारसंघात असल्यामुळे त्यांचा फायदा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना होणार आहे. आमदार संजय शिंदे यांना मानणारा वर्गही या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयार झालेला आहे. तो त्यांनी भगिरथ भालके यांच्या विजयासाठी कामाला लावला आहे, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com