भगिरथ भालकेंना घेऊन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ढोबळेंच्या भेटीला 

ढोबळे यांच्या राष्ट्रवादीत बहरलेल्या नेतृत्वाला भाजपत मात्र अनेक मर्यादा आल्या आहेत.
Minister of State Dattatreya Bharane meet to  BJP leader Laxman Dhoble
Minister of State Dattatreya Bharane meet to BJP leader Laxman Dhoble

मंगळवेढा : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक तोंडावर असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या वेळी भरणे यांच्यासोबत (स्व.) आमदार भारत भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके होते. या भेटीमुळे मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चेला तोंड फुटले आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे मंगळवेढा नगरपालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान मंत्री भरणे यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून दावेदार असलेले भगिरथ भालके यांच्यासमवेत त्यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या घरी जाऊन भेट दिली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील मिळू शकला नसला तरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेलेले अनेक मावळे परत पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. पक्षाकडूनही तसे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसची 1999 मध्ये स्थापना होताना सर्वात प्रथम कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जाणे ढोबळे यांनी पसंत केले होते. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीतील काही नेत्यांशी बिनसल्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम घेत भाजपशी जवळीक साधली आहे. ढोबळे यांच्या राष्ट्रवादीत बहरलेल्या नेतृत्वाला भाजपत मात्र अनेक मर्यादा आल्या आहेत. 

दरम्यान, मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ढोबळे यांच्या अनेक समर्थकांनी (स्व.) आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या गटाचा आसरा घेतला आहे. सध्या शाहू परिवार, सावली फाउंडेशन, बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून कोमल ढोबळे-साळुंके यांना पुढे केले आहे. त्यांच्याकडे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देत राजकीय स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने अनेक नेत्यांना जवळ ठेवणे महत्त्वाचे आहे. शिवाय प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष ही जागा प्रतिष्ठेची करू शकतो. आजच्या पालकमंत्र्यांच्या भेटी दरम्यान भगिरथ भालके उपस्थितीची होती. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर माजी मंत्री ढोबळे यांची घरवापसी होणार का? याची चर्चा सुरू झाल्याने हा विषय औत्सुक्‍याचा ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com