ढोबळेंनी निवडला आपला राजकीय वारसदार; कन्येकडे सोपवली संघटनेची जबाबदारी

सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपवली होती.
Former Minister Laxman Dhoble has chosen his political successor
Former Minister Laxman Dhoble has chosen his political successor

मंगळवेढा : भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषद या संघटनेची सूत्रे त्यांनी आपली कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांच्याकडे सोपविली आहे. या संघटनेच्या माध्यमातून त्या सक्रिय झाल्या आहेत. राजकारणात राजकीय नेत्यांच्या मुलींनी वारसदार म्हणून कर्तृत्व सिद्ध केल्याने कोमल ढोबळे या लक्ष्मण ढोबळे यांच्या राजकीय वारसदार ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवेढा, मोहोळ या विधानसभा मतदारसंघातून वीस वर्षे प्रतिनिधित्व केले. पवारांनी त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली होती. सुरुवातीला त्यांनी मंगळवेढा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मोहोळ मतदारसंघ राखीव झाला, त्या ठिकाणाहून त्यांना पक्षाने संधी दिली. एवढेच नाही तर सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपवली होती. 

मागील पंचवार्षिकला मोहोळ राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीने ढोबळे यांच्याऐवजी रमेश कदम यांना संधी दिली होती. त्यामुळे त्यांनी पक्षनेतृत्वावर तोफ डागत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. ते भाजपत गेल्याने कार्यकर्त्यांमध्येही फाटाफूट पडली. गेल्या पाच वर्षांपासून मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत परिचारक, (स्व.) आमदार भारत भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या गटाचा आश्रय घेणे पसंत केले. 

महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रभर पोचविण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी बहुजन रयत परिषद या संघटनेची स्थापना केली होती. पक्षात राहून संघटनेची केलेली स्थापना काहींना आवडली नव्हती. त्याचा माजी मंत्री ढोबळे यांना त्रासही सोसावा लागला. परंतु त्यांनी हा त्रास सोसत संघटनेचे कार्यविस्तार महाराष्ट्रभर नेला. हे कार्य पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने ढोबळे यांनी या संघटनेची जबाबदारी कन्या कोमल यांच्यावर सोपवली आहे.

कोमल ढोबळे सध्या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गट व विविध महिलाविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. आता त्यांच्यावर या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षापदाची जबाबदारी देण्यात आली.

माजी मंत्री ढोबळे यांचा राजकीय वारसदार म्हणून अभिजीत ढोबळे हे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते. परंतु त्यानंतर राजकारणात त्यांना अधिकचा प्रभाव टाकता आला नाही. त्यामुळे कोमल ढोबळे-साळुंखे यांना दिलेली संधी या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com