भाजपच्या माजी मंत्र्याकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक 

गटागटांत मतभेद, पक्षात मतभेद, महाआघाडीत मतभेद, भावकीचा संघर्ष बाजूला ठेवत वारसा असो वाटणी असो मतभेद दूर सारून महाराष्ट्राचे वैभव राखणे, ही परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली.
Former BJP minister Laxman Dhoble lauded the work of Chief Minister Uddhav Thackeray
Former BJP minister Laxman Dhoble lauded the work of Chief Minister Uddhav Thackeray

मंगळवेढा :  नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून कोरोनासह विविध संकटांचा यशस्वी मुकाबला करून राज्यात जनजीवन सुरूळीत करण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षभरातील कामाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तोंडभरून कौतुक केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून गेल्या काही वर्षांपर्यंत शरद पवार यांच्यासोबत असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षापासून दूर गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागत ते भाजपवासी झाले. परंतु भाजपचे इतर नेते शिवसेनेवर सातत्याने शाब्दीक हल्ला करत असताना मात्र, माजी मंत्री ढोबळे हे उद्धव ठाकरे यांच्या शैलीचे कौतुक करत आहे. 

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रबोधनकारांच्या आणि हृदयसम्राटांच्या (बाळासाहेब ठाकरे) सावलीत उद्धव ठाकरे मोठे झाले. आपसुकच संघटन वाढत गेले. प्रगतीचा आढावा घेताना राज्याचे प्रमुख म्हणून माहिती घेतली असता उद्धव ठाकरेंपासून सामनापर्यंत सगळेच मोठा सामना करीत असल्याचे जाणविले. अर्थात, कोरोना विषाणूचा धक्का बसलेल्या राजकारणाचा मागोवा घेत असताना अनेक देश, अनेक राज्य गोंधळून गेल्याचे जाणवले. कारण, भारताचे राजकारण विशिष्ट पद्धतीने सुरू झाले असून जातीय वादाचेही मोठे धुव्रीकरण झाले आहे. म्हणून भ्रामक सुखाच्या कल्पना पुढे आल्या असून त्यावर ठरणारे राजकारण भारतात वेगाने मार्गक्रमण करत आहे, त्यामुळे सुप्त जैविक युद्धाचे स्वप्न विकृत आणि क्रूरपणे मानव जातीसमोर आले आहे. 

त्याच वातावरणाचे स्वरूप दलितामधील प्रगत समाज शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या समाज घटकाची परिवर्तनाची चळवळ मोडली आहे. बदलत्या राजकारणात भिन्न भिन्न विचारांच्या पक्षाची मूठ बांधून अनाकलनीय राजकारणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न आणि भाजपला रोखण्यासाठी नव्हे; तर बीजेपीला कोलदांडा घालण्यासाठी नवी पक्षीय बांधणी, आडाखे आणि मनसुबे एकत्र आले. त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला. पुढे सरकार स्थापन झाले. त्याला आता एक वर्ष उलटून गेले. आज पडणार, उद्या सरकार कोसळणार, सरकार आता पडेल, हे सगळे सांगून झाले, असा चिमटाही त्यांनी स्वकीयांना घेतला. 

ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सरळ नाकासमोर बघून चालणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री करण्यात आले. तीन पक्षांनी एकत्र येऊन मनात नसतानाही आपले स्वप्न बाजूला सारून तीनही पक्षाच्या नेत्यांना शपथविधीला हजर राहणे भाग पडले. अर्थात, मनात नसताही पाठिंबा देण्यास भाग पडले. आधुनिक बदलत्या जागतिक बाजारात महाराष्ट्र पुढे कसा जाईल? राज्यात गुंतवणूक कशी वाढेल? अशी आधीच्या अनेक मुख्यमंत्र्यांची विकासाची जपलेली प्रतिमा सांभाळणे आवश्‍यक होते. परंतु जपलेली विचारधाराच खंडीत झाली. उद्योजक व व्यापारी वर्ग चिंतेत असताना कोरोना विषाणूचे सावट जगभरात पसरले. त्याचा इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक फटका आपल्या राज्याला घायाळ करून गेला आणि केवळ ईर्ष्येपोटी निष्ठा गळून गेल्या. सर्वधर्मसमभाव बाजूला राहिला. 

महाराष्ट्रात 105 आमदारांचा प्रभावी पक्ष अधिक मजबूत झाला. शक्‍य तेवढे अधिक प्रहार सरकारवर होत राहिले. जीएसटी परतावा थांबल्याचे उद्धव ठाकरेंना दुःख झाले. राज्याचा प्रमुख या नात्याने सर्व बाजूंनी येणारी संकटं मुख्यमंत्र्यांना सतावित राहिली. अर्थात उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा आजार असतानाही कधी घरातून, कधी मातोश्रीमधून, कधी वर्षा बंगल्याच्या दारातून, तर सह्याद्री गेस्ट हॉऊसमधून राजकारण सुरू झाले. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने सर्वांचे स्वागत केले, तर चार पक्षांनी कधी सोयीचे, तर कधी सेवेचे राजकारण करणे सुरूच ठेवले. त्यामुळे नेत्यांनी मैदानात लढण्यापेक्षा घरातून लढणे अधिक पसंत केले. काठावर असलेले बहुमत, समोरच्या बाकावरचा मजबूत विरोधी पक्ष यामुळे अस्तानीतील निखाऱ्यांना गोंजारणे, नाराजांना लोणी लावणे या गोष्टी उद्धव ठाकरे यांना मनात नसतानाही कराव्या लागल्या. त्यामुळे होणारा त्रास कधी घरातून, कधी समोरच्या बाकावरून तर कधी आघाडीतूनही होणारा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाला कधी कधी अवघडल्यासारखे वाटले, असेही ढोबळे यांनी आपल्या पत्रकात नमूद केले. 

सरकार आज पडेल, नाही आताच पडेल, याचा अजिबात विचार न करता महाराष्ट्राचा श्‍वास चालू कसा राहील, याचाच विचार उद्धव ठाकरेंनी अधिक केला. काळजी न करता हृदयसम्राटांचे स्मरण करीत प्रबोधनकारांची आठवण करून राजकारण चालू ठेवले. गटागटांत मतभेद, पक्षात मतभेद, महाआघाडीत मतभेद, भावकीचा संघर्ष बाजूला ठेवत वारसा असो वाटणी असो मतभेद दूर सारून महाराष्ट्राचे वैभव राखणे, ही परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली. 

"तुका म्हणे उरलो उपकारा पुरता' हे विचारात घेवून कर्तव्य पाळत आरक्षणामुळे भयभीत झालेल्या समाज घटकांना आधार देण्याचे काम करीत शिवसेना पक्षप्रमुखांनी पुढे जाण्याचा संकल्प केला. म्हणून आघाडीतला एकादा घटक रागावला की नावे ठेवतो, टोकाचं बोलतो आणि तोच घटक बैठक झाल्यावर, समझोता झाल्यावर आम्ही आघाडीतच राहणार असून समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहोत, हे आवर्जुन सांगतो. तेव्हा मात्र राज्याच्या प्रमुखांना दिलासा मिळतो, अशा शब्दांत लक्ष्मण ढोबळे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com