सोलापूर : उजनीतून समांतर नवी जलवाहिनी झाली तरीही तुम्ही सोलापूरला रोज पाणी देऊ शकणार आहात का?, सध्या सोलापूरला रोज 240 एमएलडी पाण्याची गरज आहे. टाकळीतून केलेल्या जलवाहिनीचे आर्युमान संपले आहे. अभिप्रायच्या नावाखाली तुम्ही वडापूर ते सोलापूर जलवाहिनीला ब्रेक लावू नका. वेळ मारुन नेऊ नका, सोलापूर शहर कोणत्याही एका पक्षाचे नाही, शहर सर्वांचे आहे असे पोटतिडकीने, अभ्यासपूर्ण आणि अधूनमधून आपल्या मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दाखले देत ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याला हात घातला. भाजपच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा अभ्यास अनुभवला; परंतु वडापूर ते सोलापूर जलवाहिनीसाठी महापालिका आयुक्तांचा तांत्रिक व आर्थिक अभिप्राय घेणेच योग्य असल्याचे सांगून कोठेंचा अभ्यास तूर्तास अमान्य केला.
सोलापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी भीमा नदीवरील वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) बंधाऱ्यावरून नवीन जलवाहिनी टाकावी, असा प्रस्ताव महेश कोठे यांच्यासह इतर नगरसेवकांनी मांडला. कोठे यांनी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याची अभ्यासपूर्ण माहिती सभागृहात मांडली. तुम्ही सध्यापुरतेच पाहणार आहात की पुढील दहा ते पंधरा वर्षाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करणार आहात? असा सवाल कोठे यांनी उपस्थित केला. माझ्या क्रेडिटसाठी नव्हे; तर शहरातील नागरिकांसाठी हा विषय महत्वाचा असल्याचे कोठे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
चंदनशिवेंकडून कौतुक
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे कारण सांगत सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी या प्रस्तावावर अभिप्राय घेणार असल्याचे सांगितले. कोठे यांनी मांडलेल्या अभ्यासू भाषणावर वंचित बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे भारावले, महेशअण्णा हे लोकनेते आहेत, त्यांना शहराचा गाढा अभ्यास असल्याचे सांगून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. उजनी ते सोलापूरच्या जलवाहिनीत शिल्लक राहत असलेल्या पाण्याचा कोठेंनी मांडला, कोठेंच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला.
बेरियांचा विरोध
ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यु. एन. बेरिया यांनी मात्र कोठेंचा हा मुद्दा खोडून काढला. जलवाहिनीत आजच पाणी राहत आहे, असे नाही. पूर्वीपासून पाणी राहात आहे. त्याचा याच्याशी काय संबंध? असे म्हणत ऍड. बेरिया यांनी कोठेंचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
आयुक्तसाहेब पाणीप्रश्नात लक्ष घाला
बजेट वर्षानुवर्षे येतच राहील, त्यातून कोणाला काय मिळेल, हे माहिती नाही. बजेट जरी नाही मिळाले तरीही चालेल सोलापूरकरांना रोज पाणी द्या, अशी मागणी भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली. कोठेंच्या अभ्यासपूर्ण भाषणाचेही कौतुक पाटील यांनी केले. सोलापुरात 2001 पर्यंत रोज पाणीपुरवठा होत होता. तेव्हापासून ते आतापर्यंत पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. आम्ही महिन्याला दहा हजार पगार घेतो, तुम्ही लाख रुपये पगार घेता, जरा सोलापूरच्या पाणीप्रश्नात लक्ष घाला, अशी मागणीही सुरेश पाटील यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली.
कोठेंना विरोध करा;शहराच्या प्रश्नाला कशाला विरोध करता?
हा विषय केवळ महेश कोठेंनी आणला म्हणून त्याला विरोध करायचा म्हणजे भाजपच्या बाबतीत काय बोलावे. हा विषय शहराचा आहे. हा विषय झाला नाही तर पुढील दहा वर्षे शहरातील पाणी पुरवठा सुरळित होणार नाही. उद्या जनतेला मते मागण्यासाठी कसे फिरता, हे बघूच आम्ही? ही योजना झाली तर मला क्रेडिट मिळेल, मी उद्या सोलापूर उत्तर विधानसभेचा उमेदवार होईल; म्हणून विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य, छुपे रुस्तम कोण आहेत. कोठेंना विरोध करा, शहराच्या प्रश्नाला कशाला विरोध करता? असा सवाल करत कोठेंनी आपला संताप व्यक्त केला. महापालिकेत खालच्या पातळीवर जाण्याची लाचारी भाजपला आल्याचाही टोला कोठेंनी लगावला.

