मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता : भाजप सोडल्यानंतर कल्याण काळेंची कबुली - BJP leader Kalyan Kale joins NCP in the presence of Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता : भाजप सोडल्यानंतर कल्याण काळेंची कबुली

भारत नागणे/हुकूम मुलाणी
गुरुवार, 8 एप्रिल 2021

मधल्या काळात भाजपमध्ये गेलो, तरी माझी कामे अजित पवार आणि शरद पवार यांनी कधीही अडवली नाहीत.

पंढरपूर/मंगळवेढा : सर्वसामान्य नागरिकांची कामे झाली पाहिजेत, अशा नेतृत्वाची राज्याला गरज आहे. अजितदादा पवार यांच्या रूपाने कणखर नेतृत्व राज्याला मिळालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील चांगले निर्णय घेत आहेत. मध्यल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. मी कुणीकडे चाललोय, हे कळतं नव्हतं. पण, जरी ट्रॅक सुटला असला तरी माझी भूमिका विठ्ठल परिवाराशी सुसंगत आणि शेतकरीहिताचीच होती, असे भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कल्याण काळे यांनी सांगितले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजपासून (ता. ८ एप्रिल) मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला कल्याण काळे यांचा भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अखेर प्रवेश झाला त्यानंतर कल्याण काळे बोलत होते. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके, दीपक साळुंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उत्तम जानकर, लतीफ तांबोळी आदी उपस्थित होते.
 
काळे म्हणाले की, राज्यातील साखर कारखानदारी टिकली पाहिजे आणि चालली पाहिजे, या भूमिकेने सर्वसामान्यांच्या हिताचे राजकारण करणारे आम्ही आहोत. पूर्वी ऊस गाळप हंगाम हा ऑगस्टपर्यंत चालायचा; म्हणून कारखान्याची गाळपक्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आणि नेमके त्याच वेळेला दुष्काळ पडला, त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली. विठ्ठल परिवाराच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. विठ्ठल परिवाराच्या अडचणी सुटल्यास या नेत्यांमध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची ताकद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका एक घाव दोन तुकडे अशीच आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी घेत असल्याची ग्वाही कल्याण काळे यांनी या वेळी बोलताना दिली. 

पंढरपूरचे नेतृत्व (परिचारक) एका बाजूला आणि विठ्ठल परिवार एका बाजूला आहे. तरीही सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची ताकद विठ्ठल परिवारामध्ये आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवारांनी कायम परिवाराच्या पाठीवर हात ठेवला आहे. त्यांनी दिलेल्या उमेदवारांना किंवा त्यांच्या विरोधात काम केले. मात्र, त्याचा राग त्यांनी कधीही मनात ठेवला नाही. मधल्या काळात भाजपमध्ये गेलो, तरी माझी कामे अजित पवार आणि शरद पवार यांनी कधीही अडवली नाहीत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, कारखान्याला मदत केली. अजिदादांच्या नेतृत्वाखाली काम करून राष्ट्रवादी जिल्ह्यात वाढविण्याचे प्रयत्न करणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारी टिकली पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी सहकार्य केले, असे कल्याण काळे यांनी सांगितले. 

भगिरथ भालके म्हणाले की, विठ्ठल परिवार एकसंघ राहिला पाहिजे हीच भूमिका भारतनानांची होती. आज कल्याण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने वडिलकीचा आशीर्वाद मला मिळाला आहे, त्यामुळे मला बळकटी मिळाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख