पंढरपूरच्या उमेदवारीच्या सर्वेक्षणात भगिरथ भालकेंचे नाव आघाडीवर? - Bhagirath Bhalke's name is leading in the Pandharpur candidature survey | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूरच्या उमेदवारीच्या सर्वेक्षणात भगिरथ भालकेंचे नाव आघाडीवर?

हुकूम मुलाणी 
रविवार, 24 जानेवारी 2021

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये भालके यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांना संधी द्यावी, असा सूर आहे. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करत संभाव्य उमेदवाराबाबत सध्या या मतदारसंघात सर्वेक्षण सुरू असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार सध्या मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात सर्वेदेखील सुरू आहे. 

आमदार (स्व.) भारत भालके यांच्या रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सध्या अनेकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. राष्ट्रवादीतून नेमकी संधी कोणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादीचे नेते याबाबत संभ्रम ठेवत सोयीचे उत्तर देत आहेत. आमदार (स्व.) भारत भालके यांच्या सांत्वनासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भालके यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी लक्ष घालेल, असे सूतोवाच केले होते. तसेच त्यांच्या 35 गावच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये भालके यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांना संधी द्यावी, असा सूर आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार हा जनतेच्या मनातील असेल, असे सांगीतले, तर आमदार रोहित पवार यांनी उमेदवारासाठी भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावादेखील केला होता, त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी संधी कोणाला देणार? याची उत्सुकता आहे. 

सध्या पुण्यातील एका संस्थेच्या माध्यमातून मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे, सध्याचे सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे का? राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेली युती योग्य आहे का? पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोणत्या पक्षाचा असावा व उमेदवारी कोणाला द्यावी. संभाव्य इच्छुकाला संधी दिली नाही, तर दुसरी संधी कोणाला द्यावी. आमदार भारत भालके यांनी मतदारसंघात केलेले ठळक काम काय? सध्या मतदार संघात कोणत्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने कोणत्या प्रश्‍नात लक्ष घालावे, अशा पद्धतीची प्रश्नावली आहे. हे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे जनतेकडून विचारली जात आहे. 

दरम्यान, या संस्थेच्या सर्वेक्षणातून सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत बहुतांश ठिकाणी भगीरथ भालके यांचे नाव यांचे नाव पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. तर, आमदार भारत भालके यांनी केलेल्या कामांमध्ये भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा उल्लेख केला आहे, तर भविष्यात मतदारसंघांमध्ये जलसिंचनाच्या योजनेबरोबर तरुणांना रोजगारनिर्मिती, तीर्थक्षेत्र विकास, श्री बसवेश्वर स्मारक पूर्ण करण्याची मागणी जनतेतून पुढे येत आहे. 

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाच पसंती मिळत आहे, तर शरद पवारांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या महाविकास आघाडीचे काम सध्या समाधानकारक आहे, असा दावा मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेमधून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या पडद्यामागे कोणत्या पक्ष आहे, याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख