मुंडे समर्थक आक्रमक : ZP, पंचायत समिती सदस्यांसह १४ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Munde Supporters 14 office bearers of Beed BJP resigned | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडे समर्थक आक्रमक : ZP, पंचायत समिती सदस्यांसह १४ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. भारतीय जनता पक्षातील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (ता. १० जुलै) बीडमधील १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. (Munde Supporters 14 office bearers of Beed BJP resigned)

शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सविता रामदास बडे, तर प्रकाश खेडेकर यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांसह १४ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवून दिले आहेत. प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने मुंडे भगिनींवर अन्याय केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंडे यांच्यावर अन्याय केला जात असून यापुढे तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही समर्थकांनी दिला आहे.

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही : कॉंग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ७ जुलै रोजी झाला. त्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. सुरुवातीला आघाडीवर असलेले मुंडे यांचे नाव विस्ताराच्या दिवशी मागे पडले आणि प्रीतम यांची केंद्रीय मंत्री होण्याची संधी हुकली. मुंडे यांच्याऐवजी खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आली.

केंद्रीय मंत्रीमंडळातून पत्ता कट झाल्याने पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे ह्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, काल पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र समर्थकांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

विस्ताराच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. काहींनी तर थेट पंकजा मुंडे यांना ‘ताई आता निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत कायम राहू’ असे साकडे घातले होते. बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक नाराजांनी शुक्रवारपासून (ता. ९ जुलै) भाजपतील आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज बीडमध्ये १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. हे सर्व फादर बॉडी आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख