आणखी एक अँटीबॅाडी कॅाकटेल! फुफ्फुसातील संसर्गावर परिणामकारक...मंजुरीची प्रतिक्षा - Zydus Cadila seeks permission for antibody cocktail human trail | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आणखी एक अँटीबॅाडी कॅाकटेल! फुफ्फुसातील संसर्गावर परिणामकारक...मंजुरीची प्रतिक्षा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

अशाच प्रकारच्या कॅाकटेलला अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन औषधांचा एकत्रित अॅंटीबॅाडी कॅाकटेलचा डोस देण्यात आला होता. सुरूवातीच्या काळात रुग्णाच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण (Viral Load) कमी करण्यात हा डोस परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला जात आहे. आता आणखी एक अॅंटीबॅाडी कॅाकटेल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. या औषधाच्या डोसमुळे संसर्गानंतर फुफ्फुसाला होणारी हाना टाळता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

रोशे इंडिया या औषध उत्पादक कंपनीने भारतातील पहिले अॅंटीबॅाडी कॅाकटेल सोमवार (ता. २४) पासून भारतात उपलब्ध केले आहे. गुडगांव येथील मेदांता रुग्णालयातील ८२ वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णाला हे इंजेक्शन देण्यात आले. या रुग्णालयात हे इंजेक्शन घेणारे ते पहिलेच रुग्ण होते. त्यांना इतर काही आजारही आहेत. इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाचे अध्यक्ष डॅा. नरेश त्रेहान यांनी दिली. Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांना एकत्रित करून हे अॅंटीबॅाडी कॅाकटेल बनविण्यात आले आहे. 

हेही वाचा : Yaas Cyclone : तीन लाख कुटूंबाचा संसार उघड्यावर, चौघांचा मृत्यू

आता भारतातील झायडस कॅडिया या कंपनीनेही असेच अँटीबॅाडी कॅाकटेल (ZRC-3308) तयार केले आहे. या औषधाच्या प्राण्यांवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये फुफ्फुसावर होणारा घातक परिणाम कमी करण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे. तसेच हे सुरक्षित असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. आता मानवी चाचण्यांसाठी कंपनीकडून भारतीय औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष रुग्णांवर या औषधांची चाचणी सुरू होईल. या औषधामध्ये दोन मोनोक्लोनल अँटीबॅाडीजचे कॅाकटेल असून त्यामुळं नैसर्गिक अँटीबॅाडींमध्ये वाढ होते. 

अशाच प्रकारच्या कॅाकटेलला अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. हे औषध वीर बायोटेक्नॅालॅाजी आणि ग्लॅक्सोएस मिथक्लीन यांनी तयार केले आहे. रोशे कंपनीच्या कॅाकटेलला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. 
 
काय आहे रोशे इंडिया कंपनीचा कॅाकटेल डोस?

Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांना एकत्रित करून हे अॅंटीबॅाडी कॅाकटेल बनविण्यात आले आहे. प्रत्येक १२०० मिलीग्रॅमच्या डोसमध्ये ही औषधे समप्रमाणात एकत्र केली जातात. त्यातून हा कॅाकटेल डोस तयार होतो. प्रत्येक पॅकमध्ये दोन रुग्णांवर उपचार होऊ शकतात. या एका पॅकची किंमत १ लाख १९ हजार ५०० एवढी आहे. तर एका डोससाठी ५९ हजार ७५० रुपये मोजावे लागतील, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

हे औषध मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते. औषध घेतल्यानंतर रुग्णालयात भरती होण्याचा किंवा मृत्यूचा धोका ७० टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये सध्या एक लाख पॅक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आले. सिप्लाकडून हे औषध भारतीय बाजारात आणण्यात आले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे औषध सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल. केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रक संस्थेने (CDSCO) ने या औषधाला आप्तकालीन वापरासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख