तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे : फडणवीसांचा ठाकरेंना टोला  - Your insult is not an insult to Maharashtra: Fadnavis scolds Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे : फडणवीसांचा ठाकरेंना टोला 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम तयार करणार, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. 

मुंबई : तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे, महाराष्ट्र म्हणजे येथील बारा कोटी जनता आहे, असे सांगत आज (ता. 8 ऑक्‍टोबर) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

भाजप कार्यकारिणीच्या समारोपावेळी बोलताना मराठा आरक्षणाबाबत महिनाभर वेळ घालवला, कारण या सरकारला आरक्षण द्यायची इच्छाच नाही, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे. 

हाथरसचा निषेध प्रत्येकाने केलाच पाहिजे; परंतु महाराष्ट्रातील किती भगिनींबद्दल संवेदना दाखविली? असा सवाल करत ते म्हणाले की, कोविड सेंटरमध्ये बलात्कार आणि विनयभंग या नित्याच्याच घटना झाल्या आहेत. किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम तयार करणार, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. 

महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांना हाथरसची घटना दिसते महाराष्ट्राच काय? हिंगणघाटला मुलीला जाळण्यात आलं, त्या ठिकाणी का नाही तुम्ही गेला? सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत झोपलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

मराठा आरक्षणावर आज राज्यभरात संताप आहे, पण राज्य सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू आहे, असा आरोप फडणवीसांनी केला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत; परंतु शेतकऱ्याला कवडीची मदत मिळाली नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात, "पिकेल ते विकेल'. हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. 

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्यांनासुद्धा माझी विनंती आहे, कायदेशीर मार्गाने आंदोलन करा. कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. 

कोरोनामुळे राज्यात 39 हजार लोकांचा मृत्यू झाला असताना मंत्र्यांना झोप कशी येते. आज राज्यात लोक किड्या मुंग्यासारखे मरत आहेत, याच सरकारला काही पडलेले नाही. सध्या एकच धंदा सुरू आहे तो म्हणजे बदल्यांचा असा आरोपही फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला. ते म्हणाले, की प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सरकार करतयं. कोरोनामध्ये लोक मरत असताना भ्रष्टाचार सुरू आहे, असा घाणाघात फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला. 

आम्ही जो कायदा तयार केला, त्यात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली आहे. ओबीसी आरक्षण कायम राहिले पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख