तू पुढे राष्ट्रवादीत जा... मी आलोच तुझ्या पाठीमागून : खडसेंचा स्पष्ट शब्दांत निरोप - you join ncp first then i will follow you khadase advices Padavi | Politics Marathi News - Sarkarnama

तू पुढे राष्ट्रवादीत जा... मी आलोच तुझ्या पाठीमागून : खडसेंचा स्पष्ट शब्दांत निरोप

दिनू गावित
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

खडसे यांची भाजपमधून एक्झिट जवळपास निश्चित!

नंदुरबार : तू पुढे राष्ट्रवादीत जा. मी आलोच तुझ्या पाठीमागून, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला निरोप दिल्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा निश्चित असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानण्यात येत आहे. पाडवी हे शहादा-तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 

पाडवी यांना आपणच राष्ट्रवादीत जा, असा सल्ला दिल्याचे खडसे यांनी या आधी सांगितले होते. त्यास पाडवी यांनीही दुजोरा दिला. पाडवी म्हणाले की मी आधी भाजपमध्ये होतो. तेथे माझी कोंडी होत होती. मला विश्वासात घेतले जात नव्हते. माझ्या कार्यकर्त्यांन सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे मी खडसे साहेबांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांनी तू राष्ट्रवादीत जा, तुझ्या पाठीमागून मी पक्षात प्रवेश करीन, असा सल्ला दिला. त्यानुसार मी केले.

खडसे यांचा प्रवेश केव्हा होणार, या प्रश्नावर पडवी म्हणाले की खडसे आणि पवार साहेबांची भेट झाल्याची चर्चा मी ऐकली. त्यावर मी त्यांना मुक्ताईनगर येथे भेटायला गेलो. तुम्ही मला पक्षात पुढे पाठवले पण तुमचे काय, असा प्रश्न मी त्यांना विचारल्यावर जो पक्ष मला आमदारकी आणि चांगले पद देईल, त्या पक्षात आपण जाणार असल्याचे खडसे यांनी मला उत्तरात सांगितले आहे. त्यानुसार त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा जवळपास निश्चित आहे.  खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून त्यांना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार असून त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे. त्याच सोबत खडसे यांना  राज्याच्या मंत्रिमंडळात हे स्थान मिळणार असल्याचे पाडवी यांना स्पष्ट केले. 

ही बातमी पण वाचा : खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश घटस्थापनेच्या दिवशी

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. येत्या शनिवारी या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच 17 ऑक्‍टोबर रोजी प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संघटनात्मक पद व आमदारकी देण्यावर पक्षांतराचे हे "सूत्र' ठरल्याचेही सांगितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे पक्षावर नाराज आहेत. भाजपने त्यांना 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही नाकारली होती. त्यानंतर विधान परिषदेवरही त्यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी वाढून गेल्या महिन्यात खडसे यांनी थेट फडणवीसांचे नाव घेऊन टीका केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. 

पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद 
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी चाचपणी केली होती. खडसे हे गेल्याच आठवड्यात मुंबईला जाऊन आले आहेत. त्याच वेळी खडसे- पवारांच्या भेटीची चर्चा रंगली होती; परंतु प्रत्यक्षात भेट झाली नसल्याचे दोन्ही बाजूने नाकारण्यात आले होते.

मात्र, या मुंबईवारीतच खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे सूत्र काय असेल, हे ठरल्याचे बोलले जात आहे. पक्षप्रवेशानंतर संघटनात्मक पद, विधान परिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले असून ठाकरे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना मंत्रिपद, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख