कोरोनाचा विषाणू चीनमधून आला आहे, हे विसरू शकत नाही : ट्रम्प  - You can't forget that the corona virus came from China: Trump | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा विषाणू चीनमधून आला आहे, हे विसरू शकत नाही : ट्रम्प 

वृत्तसंस्था
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

जॉर्जिया येथे ‘ब्लॅक व्हॉइस फॉर ट्रम्प या कार्यक्रमात ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळातील योजनांची माहिती दिली.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरची नाराजी उघड केली आहे. अमेरिकेत पुन्हा सत्तेत आलो तर चीनवरची अवलंबिता संपवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना संसर्ग संपल्यानंतर दोन्ही देशातील संबंध पूर्वीसारखे राहतील, असे वाटत नाही. कारण कोरोना संसर्गाचा विषाणू हा चीनमधून आला आहे, हे आपण विसरू शकत नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

न्यू पोर्ट व्हर्जिनिया येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले, की अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगली वाटचाल करत होती. परंतु चीनमधून आलेल्या विषाणूने सर्व काही उध्वस्त केले आहे. असे घडायला नको होते. ही बाब आपण कधीही विसरू शकत नाही. आपण सीमा बंद केल्या. लोकांचे जीव वाचवले. आता पुन्हा नव्याने उभारी घेत आहोत. संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून आतापर्यंत २ लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

देशाची अर्थव्यवस्था देखील बिकट झाली आहे. परिणामी लाखो नागरिकांनी रोजगार गमावला आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा जिंकून आलो तर येत्या चार वर्षात अमेरिकेला सुपरपॉवर देश करु, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांना दिले. चीनवरचे अवलंबित्व कायमस्वरुपी संपुष्टात आणू असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वीही यूएनच्या सभेत कोरोना संसर्गाच्या प्रसाराला चीनला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

कृष्णवर्णीय मतदारांना ट्रम्प यांची साद 
 अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला चाळीस दिवसांपेक्षा कमी दिवस राहिले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारसभेला वेग आलेला असताना पारंपारिक मतदारांबरोबरच अन्य मतदारांनाही खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत दुसऱ्यांदा सत्तेत्त आल्यानंतर कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक मतदारांसाठी काम करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

जॉर्जिया येथे ‘ब्लॅक व्हॉइस फॉर ट्रम्प या कार्यक्रमात ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळातील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, कृष्णवर्णिय लोकांच्या आर्थिक विकासासाठी आणि कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न केले जाईल. या वेळी ट्रम्प यांनी ‘जुनटिंथ’ घटनेची आठवण काढली. १९ जून १८६५ रोजी अमेरिकेतील गुलामी प्रथा बंद झाली. तो दिवस ‘जुनटिंथ’ या नावाने म्हणजेच मुक्ति दिन आणि स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 

ट्रम्प यांनी येथील सभेत बायडेन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बायडेन हे कधीही बाहेर येत नाहीत. येत्या ३ नोव्हेंबर रोजी निवडणुक हारल्यानंतर त्यांची स्थिती आणखीच बिकट होईल. या वेळी ट्रम्प यांनी पोलिसांकडून कृष्णवर्णीय नागरिकांच्या झालेल्या हत्येबाबत शोक व्यक्त केला. ब्रेटन टेलर, जॉर्ज फ्लॉईड आणि अहमद एर्बी यांच्या मृत्युबद्धल आपण दु:खी झालो आहोत, असे ट्रम्प म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख