तुम्हालाही मुले आहेत... हा उद्धव ठाकरेंचा इशारा नारायण राणेंना? - you also have sons warns uddhav thaceray bjp leaders | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्हालाही मुले आहेत... हा उद्धव ठाकरेंचा इशारा नारायण राणेंना?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

भाजपचा खरपूस समाचार ठाकरेंनी मुलाखतीत घेतल्याचे दिसून येत आहे...

मुंबई : महाआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बरीच आक्रमक वक्तव्ये केल्याचे या मुलाखतीच्या प्रोमोत दिसत आहे. आघाडी सरकारला आणि विशेषतः पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या नेत्यांना त्यांनी या मुलाखतीत थेट इशारा दिला आहे. या त्रास देणाऱ्या नेत्यांबद्दल बोलताना त्यांनी  तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही देखील धुतल्या तांदळासारखे नाही. मी मागे लागलो तर तुमचे काही खरे नाही. त्यांनी आरशात बघावे, असा सल्ला त्यांनी दिला.

त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे आहे, याची आता चर्चा सुरू आहे. अभिनेता सुशांत राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक भाजप नेत्यांनी आरोप केले. त्यात नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, अतुल भातखळकर, राम कदम या नेत्यांनी आदित्य यांच्याकडे संशयाची सुई वळविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच ठाकरे यांचे हे विधान असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या विधानाला राजकीय महत्त्व आहे. ईडी, सीबीआय यांच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या किंवा माझ्या मागे लागलात तर मी देखील तुमच्या मुलांच्या मागे लागेन, असे थेपटणे उद्धव ठाकरे यांनी सुचविले आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर सरनाईक यांचे व्यवहार हे मातोश्रीपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप काही भाजप नेत्यांनी केला. त्यामुळे ठाकरे आता सरनाईक प्रकरणानंतर अधिक आक्रमक होणार का, याची चर्चा सुरू आहे. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी याने ठाकरे यांच्यावर बरेच आरोप केले होते. त्यांनाही पोलिस कोठडीची हवा ठाकरे सरकारने चाखायला लावलीच. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची सुटका झाली. 

उद्धव ठाकरे यांची मुलाखत गुरूवारपासून `सामना`त प्रसिद्ध होणार आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखतीचा पहिला प्रोमो आज सकाळी सोशल मीडियावर शेअर केला. सायंकाळी दुसरा प्रोमो शेअर केला.

संजय राऊत  – हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असे भाकीत करत आलेत?

उद्धव ठाकरे – असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आलेत.

संजय राऊत – पण दात कसे पाडले तुम्ही?

उद्धव ठाकरे – सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही 10 सूड काढतो.

संजय राऊत– पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात अघोरी प्रयोग सुरु आहेत?

उद्धव ठाकरे – आमच्या आंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना त्यांना सांगू इच्छितो, की तुम्हाला देखील मुलबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाही. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.

संजय राऊत – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कसं वाटत? महाराष्ट्र मोठं राज्य आहे, मग महाराष्ट्र हे आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा यापलिकडे काय करतात?

उद्धव ठाकरे (उत्तर) – ठिक आहे, हात धुतो आहे , जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन.

संजय राऊत – तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला ?

उद्धव ठाकरे (उत्तर) – हे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. पण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते. कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख