योगीजी, हा महाराष्ट्र तुमच्या मदतीसाठी तयार आहे....

योगीजी, यूपीत एक हजार एकरावर फिल्मीसिटी उभारत आहात याचे स्वागतच आहे. महाराष्ट्रही यूपीच्या फिल्मसिटीसाठी दोन पावले पुढे येईल. म्हणूनच योगीजी तुमच्या मुंबई भेटीचे मराठी माणूस स्वागत करतो. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. सांगा, आम्ही तुम्हाला कोणती मदत करू ?
 योगीजी, हा महाराष्ट्र तुमच्या मदतीसाठी तयार आहे....

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आजचा मुंबई दौरा कधी नव्हे इतका चर्चेत आला आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी योगींवर तुटून पडली आहेत. मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्यावर आणि मराठी अस्मितेवर शिवसेनेचे नेते-प्रवक्ते आक्रमक झाले असले तरी योगींच्या नावे शंख करणे योग्य होणार नाही. वास्तविक योगी मुंबईत बॉलिवूड पळवायला आले आहेत, असा याचा अर्थ काढण्यात काहीच अर्थ नाही. 

ते काही महाराष्ट्राचा लचका तोडायला आलेले नाहीत. हे मुळात योगींना विरोध करणाऱ्या मंडळींनी लक्षात घेणे गरजेचे आहे. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून आपले पोट भरण्यासाठी लोक मुंबईत येत आहेत. मुंबईत जे स्थलांतर होत आले किंवा झाले त्या सर्व मंडळींना आपण ओसरी दिली. त्यांना पाय पसरू दिले. याच मुंबईने परप्रांतियांना कधी मराठी करून घेतले हे कळले नाही.

मुंबई असो की पुणे परप्रांतातून आलेले अनेक मंडळींच्या चारपाच पिढ्या मराठी संस्कृतीत वाढल्या. ते कधी ज्ञानोबा-तुकारामाचा घोष करू लागले हे कळले नाही. ही सगळी मंडळी अर्थात मराठीच आहे. तेच बॉलिवूडविषयी म्हणता येईल. 

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच. दादासाहेबांना मराठी माणसांइतकाच प्रत्येका देशवासियाला अभिमान वाटत आला आहे. मुंबईच्या पोलिसांची तुलना जशी स्कॉटलॅंड यार्ड पोलिसांशी केली जाते तसे हॉलीवूडनंतर बॉलीवूडकडे पाहिले जाते. बॉलिवूडने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर जे उल्लेखनीय काम केले आहे ते कदापि विसरता येणार नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे बॉलिवूड मुंबईत आहे आणि मुंबईची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. 

मुंबईचं आकर्षण भल्याभल्यांना असते. मुंबई मराठी माणसाची. बॉलिवूड मुंबईचे. बॉलिवूडमध्ये स्टार, सुपरस्टार बनलेले अभिनेते मुंबईच्या ऋणातच राहतात. याच बॉलिवूडमध्ये मराठी माणसानेही आपला ठसा उमठविला आहे. ज्येष्ठ निर्माते व्ही. शांताराम, सी. रामचंद्र, लता मंगेशकर, आशा भोसले, ललिता पवार (राज कपूर म्हणायचे ही माझी खरीखरी आई आहे), अमोल पालेकर, शोभना समर्थ, नूतन, तनुजा, सचिन पिळगांवकर, नाना पाटेकर, स्मिता पाटील आदी मराठी मंडळींनी बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला. तो ही अमराठी माणसांच्या खांद्याला खांदा लावून. 

सिनेसृष्टीचा जनक मराठी माणूस. याच मराठी माणसाचा आदर्श घेऊन कदाचित योगीजी यूपीतही एक हजार एकरावर फिल्मीसिटी उभारत आहेत. याच्या तयारीसाठी ते अभिनेते, निर्माते यांना भेटत आहेत. पण जे मराठी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आहेत. त्यांनाही भेटीचे निमंत्रण दिले असते बरं झालं असतं. यूपीतील फिल्मसिटीला मराठी माणूस मदतीचा हात पुढे करेल यात मुळी शंका घेण्याचे कारणच नाही. 

यूपीतील फिल्मसिटीमुळे तेथे विकासाची गंगा वाहणार असेल यापेक्षा मराठी माणसाला मोठा आनंद नाही. केवळ यूपीतच नव्हे तर प्रत्येक राज्यात अशी फिल्मसिटी उभी राहिली तरी बॉलिवूडचे महत्त्व कदापी कमी होणार नाही.

महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला अनेक चांगल्या योजना दिल्या आहेत. रोजगार हमी योजना असेल किंवा स्वच्छता अभियान असेल. याप्रमाणेच महाराष्ट्रही यूपीच्या फिल्मसिटीसाठी दोन पावले पुढे येईल. म्हणूनच योगीजी तुमच्या मुंबई भेटीचे मराठी माणूस स्वागत करतो. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. सांगा, आम्ही तुम्हाला कोणती मदत करू ?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com